अहमदनगर प्रतिनिधी – शहरात अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, रस्ते आदि कामे प्राधान्यांने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु असून, संबंधित ठेकेदारांना त्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. शहरातील अनेक ड्रेनेज पावसाच्या पाण्याने तुंबत आहेत, नवीन ड्रेनेज लाईनही टाकण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ही कामे तातडीने पुर्ण करण्यात येत आहेत. मध्य शहरातील अनेक भागातील ड्रेनेजचे पाणी तसेच पावसाचे पाणी हे नालेगांव मार्गे जात असल्याने येथील ड्रेनेज लाईनचे काम हे दर्जेदार होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सातपुते तालिम परिसरात सुरु असलेल्या कामाची पाहणी करुन सबंधितांना सूचना दिल्या आहेत. भविष्यात या मोठ्या ड्रेनेज लाईनमुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
नालेगांव मधील सातपुते तालिम परिसरात सुरु असलेल्या ड्रेनेज लाईन कामाची पाहणी महापौर रोहिणी शेंडगे यांनी करुन सुचना दिल्या. याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे, संजय शेंडगे, गणेश शिंदे, विनायक गुरसाळे, संतोष गेनप्पा, गणेश डोळसे, गणेश मराठे, राजू वराडे, अक्षय कांडेकर, ओंकार शिदे, दिपक दळवी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे म्हणाले, शहरातील अनेक भागातून नालेगावात पाणी येत असल्याने या ठिकाणी मोठ्या ड्रेनेजलाईनची आवश्यकता होती, ती मंजुर करुन ते काम मार्गी लागले आहे, पुढील काळात या भागातील रस्ताही चांगल्या पद्धतीने केला जाईल. यासाठी महापौरांचे मोठे सहकार्य मिळत असून, त्यामुळे प्रभागातील अनेक कामे मार्गी लागत आहेत. हा रस्ता अमरधामकडे जात असल्याने या ठिकाणची कामे दर्जेदार व चांगली होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, असे सांगितले.