निमगाव वाघात तंबाखू सेवन विरोधी दिवस साजरा
व्यसनमुक्तीचा विद्यार्थ्यांसह युवकांमध्ये जागर; व्यसन करणार नाही व करु देणार नसल्याची दिली शपथ
सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज – पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शुक्रवारी (दि.31 मे) तंबाखू सेवन विरोधी दिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
संस्थेच्या वतीने युवक व शालेय विद्यार्थ्यांना व्यसन करणार नसल्याचे व घरातील व्यक्तींना व्यसन करु देणार नसल्याची शपथ संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली. यावेळी अजिंक्य वाबळे, कृष्णा डोंगरे, युवराज येवले, शिवा डोंगरे, कार्तिक डोंगरे, अंकिता येवले, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात स्वत:चे अस्तित्व सिध्द करणारे युवक ताणतणाव व निराशेमुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. तंबाखू व धुम्रपान करणाऱ्या युवकांची संख्या अधिक असून, फॅशन म्हणून युवक-युवती व्यसन करताना दिसत आहे. कमी वयातच व्यसनाधिन झालेले युवकांची संख्या दिवसंदिवस वाढत असून, व्यसनापासून युवकांना दूर करण्यासाठी जनजागृतीद्वारे मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात वाढत चाललेली व्यसनाधिनता कमी होण्यासाठी तंबाखूचे दुष्परिणामाची जागृती या उपक्रमाद्वारे करण्यात आली. या उपक्रमास नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.