निमगाव वाघात पाडव्यापासून हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ
पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन
15 एप्रिलला काळभैरवनाथ मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन होणार कलशारोहण
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा रंगणार आहे. गावाच्या नवनाथ मंदिरात या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हे 37 वे वर्ष असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाचे पाडव्याच्या मुहुर्तावर मंगळवारी (दि.9 एप्रिल) प्रारंभ होणार आहे. हा सोहळा गुरुवार दि. 18 एप्रिल पर्यंत रंगणार असून, या दहा दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन निमगाव वाघा ग्रामस्थ, भजनी मंडळ, नवनाथ सोहळा समिती व अखिल भारतीय वारकरी मंडळाने केले आहे.
वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबाबा देशमुख (आळंदी), वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे (पिंपळगाव माळवी) व वैकुंठवासी ह.भ.प. जयसिंग महाराज मडके (सोने सांगवी) यांच्या आशिर्वादाने तर गुरुवर्य ह.भ.प. मारुती बाबा कुर्हेकर (आळंदी देवाची), गुरुवर्य ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी), रामायणाचार्य ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी), ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर (निमगाव वाघा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमात ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), अशोक महाराज इलग शास्त्री (बोधेगाव), धर्मगुरु अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), उध्दव महाराज मंडलिक (नेवासा), भिमराव महाराज दराडे (बीड), मच्छिंद्र महाराज पैठणकर (पैठण), हरिदास महाराज पालवे (आळंदी देवाची), उमेश महाराज दशरथे (मानवत), विठ्ठल महाराज खळदकर (निमगाव वाघा), ज्ञानेश्वर महाराज कदम (आळंदी देवाची) यांचे किर्तन होणार आहे.
सोमवार दि.15 एप्रिलला सकाळी गावात जिर्णोध्दार करण्यात आलेल्या काळभैरवनाथ महाराज मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होणार आहे. बुधवारी (दि.17 एप्रिल) सकाळी विठ्ठल महाराज खळदकर राम जन्माचे किर्तन करणार आहेत. तर गुरुवारी 18 एप्रिल रोजी सकाळी ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे आळंदी देवाची यांचे काल्याचे किर्तन होवून, महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. दररोज पहाटे काकडा भजन व सकाळी ज्ञानेश्वरी पारायण तर संध्याकाळी हरिपाठ होणार आहे. रात्री 7 ते 9 वाजता किर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसाद राहणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी दिली.