निमगाव वाघात बिरोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त निघाली कावडीची मिरवणूक
वीस वर्षापासून कावडीने गंगाजल आणणाऱ्या युवकांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त मागील वीस वर्षापासून कावडीने गंगाजल आणणाऱ्या युवकांचा वीरभद्र बिरोबा देवस्थान, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त गावातील युवक अनेक वर्षापासून कावडीने गंजाजल आनत आहे. नुकतेच गावातील युवकांनी कावडीने गंगाजले आणले. यावेळी गावातून मोठ्या उत्साहात कावडीची डफ, ढोल, ताशे व लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली. तर श्रीबिरोबा महाराजांच्या मूर्तीस गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा करण्यात आली.
वीस वर्षापासून कावडीने गंगाजल आणणारे विजय जाधव, अंबादास निकम, राजू भुसारे, दत्तात्रय शिंदे, सचिन उधार, ज्ञानदेव जाधव, भाऊ साळवे आदींचा देवाचे भगत नामदेव भुसारे व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळू भुसारे, बाबा जाधव, पांडुरंग गुंजाळ, बाबा पुंड, संजय डोंगरे, रामदास वाखारे, रावसाहेब भुसारे, युवराज भुसारे आदी उपस्थित होते.
श्री बिरोबा मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गावात रात्री रेखा सविता नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. तर छबीना मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवकांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत आसमंत उजळून निघाला. यावेळी उद्योजक अरुण फलके, किरण जाधव, संदीप डोंगरे, अरुण कापसे, अनिल डोंगरे, वैभव फलके आदी उपस्थित होते.