निमगाव वाघात रविवारी रंगणार पाचवे काव्य संमेलन
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा होणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवारी (दि.9 जून) निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन रंगणार आहे. छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मतदार जागृतीसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक माधवराव लामखडे यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान व राष्ट्र संत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांना उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान केला जाणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी दिली.
काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूरचे ज्येष्ठ कवी आनंदा साळवे तर स्वागताध्यक्षपदी जिजाऊ व्याख्यात्या अनिता काळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शहाणे उपस्थित राहणार आहे. यावेळी नवोदित व राज्यातील नामवंत कवींचे काव्य संमेलन होणार आहे. या कार्यक्रमासाठी गझलकार रज्जक शेख, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, दिलावर शेख उपस्थित राहणार आहेत.