निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी महिलांनी व्यायामाकडे लक्ष देणे काळाची गरज -भाग्यश्री बिले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महिलांची आरोग्य तपासणी करुन महिला दिन साजरा

नेहरु युवा केंद्र, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा संयुक्त उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी महिलांनी व्यायामाकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. आजच्या युगात स्वसंरक्षणाबरोबर निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर नित्य नियमाने व्यायाम केला पाहिजे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्‍या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी अनेक आजारांना महिलांना सामोरे जावे लागते. आरोग्य धनसंपदा समजून व्यायाम करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.

नेहरु युवा केंद्र, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेमार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नगर-सोलापूर रोड, सारसनगर येथील इंदिरा कॉलनीत महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बिले बोलत होत्या.

यावेळी दंतरोग तज्ञ डॉ. स्वाती चंगेडिया, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, माजी नगरसेविका मनीषा भागानगरे, जिल्हा बँकेच्या महिला बचत गट व्यवस्थापिका विद्या तन्वर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, डॉ. अमोल बागुल, उत्कर्षच्या अध्यक्षा नयना बनकर, सचिव सिमोन बनकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दंतरोग तज्ञ डॉ. स्वाती चंगेडिया म्हणाल्या की, अनेक आजारांचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मुख आहे, मुखाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दातांची योग्य निगा राखली गेली पाहिजे. दात किडणे, दुर्गंधी येणे, पिवळे दात यासह विविध दंत आजार भेडसावत आहे. त्यासाठी वर्षातून एकदा तरी दंत तपासणी केली पाहिजे. तर दिवसातून किमान दोन वेळेस तरी दातांची स्वच्छता करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी उपस्थित महिलांची दंत तपासणी केली.

विद्या तन्वर म्हणाल्या की, आर्थिक सुबत्ता येऊन जीवनमान सुधारण्यासाठी महिलांचे बचत गट हे आर्थिक उन्नतीसाठी एक पर्वणीच आहे. बचत गटाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय, कच्चामाल, उत्पादन, विक्री कौशल्य, विविध प्रशिक्षण, कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचा महिलांनी स्वतःच्या कुटुंबासाठी फायदा करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉ. अमोल बागूल यांनी लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शंभर टक्के मतदान होण्यासाठी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. माझे मत, माझे भविष्य समजून लोकशाही सुदृढ केली, तर निश्‍चितच विकास होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे यांनी महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी ज्युदो-कराटे, तायक्वांदो, कबड्डी, हॉलीबॉल आदी मैदानी खेळात सहभागी होऊन, आरोग्य जपले पाहिजे. शासनाच्या युवक कल्याण योजनेचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी समाजातील तळागाळापर्यंत नागरिकांचे आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी आरोग्य शिबिराची गरज असून, उत्कर्ष संस्थेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी सुषमा अल्हाट, सुनिता नायडू, पूजा भिंगारदिवे, मंदा भिंगारदिवे, संगीता भिंगारदिवे, रिटा ढगे, मीना भिंगारदिवे, शिला भिंगारदिवे, शोभा उबाळे, सृष्टी पाटोळे, सारिका पाटोळे, सुनिता जाधव, छाया जाधव, सुरेखा कदम, मालनबाई वाकडे, माया सकट, अंकिता झरेकर, साक्षी बनकर, गौरी गायकवाड, मीना जाधव आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जय असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, अ‍ॅड. अनिता दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!