निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी पुन्हा नगरमध्ये
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफही धडाडणार
सकाळी श्रीगोंद्यात तर सायंकाळी नगरमध्ये प्रचार सभा
नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी (दि.८) पुन्हा नगरमध्ये येत असून त्यांच्या सोबत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफही या वेळी धडाडणार आहे. माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात हे ही यावेळी उपस्थित राहणार असून या तिन्ही नेत्यांची सकाळी १०.३० वाजता श्रीगोंदा येथे संत शेख महंमद महाराज मैदान तर सायंकाळी ४ वाजता नगर मधील क्लेरा ब्रुस हायस्कुल मैदानात सभा होणार आहे.
निलेश लंके यांनी दि.१ एप्रिल पासून मतदार संघात काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता दि.१९ एप्रिल रोजी नगरमध्ये ऐतिहासिक गांधी मैदानात जाहीर सभेने झाली होती. त्यावेळी ही शरद पवार व शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार यांनी राहुरी व शेवगाव मध्ये लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. आता बुधवारी त्यांच्या आणखी २ सभा होत आहेत. या वेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
निलेश लंके यांनी अगोदर स्वाभिमान जनसंवाद यात्रा आणि त्यानंतर जाहीर प्रचारात मतदार संघात चांगलीच आघाडी घेत संपूर्ण नगर दक्षिण मतदार संघ ढवळून काढला आहे. त्यामुळे विरोधी महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फुटला असून मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा त्यांना घ्यावी लागली. या शिवाय अनेक बड्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या सभा आयोजित कराव्या लागल्या आहेत. मोदी यांनी नगरच्या सभेत केलेल्या आरोपांना शरद पवार कसे उत्तर देतात आणि खा.संजय राऊत भाजपा व महायुतीवर कसा हल्लाबोल करतात या कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बुधवारी (दि.८) होणाऱ्या या दोन्ही प्रचारसभांसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.