निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेने, नि:पक्ष पध्दतीने काम करावे – जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शिर्डी लोकसभा मतदार संघातील नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा
शिर्डी लोकसभेत १७०८ मतदान केंद्र : १६ लाख ६० हजार मतदार : ८४२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया – निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची माहिती
शिर्डी – सर्व उमेदवार व पक्षांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व अनुसूचित पध्दतीच्या वापरावर निर्बंध आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने व समन्वयाने काम करावे. निवडणूकी कामी नियुक्ती अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अतिशय तत्पर व दक्ष राहत नि:पक्ष पध्दतीने कामकाज करावे. अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी आज येथे केल्या.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध पथक प्रमुख (नोडल अधिकारी) यांची आज राहाता येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने, राहाता तहसीलदार अमोर मोरे तसेच विविध निवडणूक समित्यांचे पथक प्रमुख (नोडल अधिकारी) उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले की, सध्या उष्णतेची तीव्रता अधिक आहे. त्यादृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय पथकासह मेडीकल कीटची व्यवस्था करण्यात यावी. निवडणूकामी नियुक्त सर्व अधिकारी-कर्मचारी हे निवडणूक आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर असतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अतिशय दक्ष राहून निवडणूक विषयक सूचनांचे काटेकोर पालन करावे.
यावेळी सी-व्हीजील ॲपवरील आचारसंहितेच्या कारवाया, ईव्हीएम मशीन, पोस्टल मतदान प्रक्रिया, खर्च पथकाचे कामकाज, वाहतूक व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठीच्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
अपर जिल्हाधिकारी श्री.कोळेकर म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या मताचा अधिकार वापरला पाहिजे एका मतामध्ये सरकार बनविण्याची ताकद असते. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वत: तर मतदान करावे ; मात्र नागरिकांमध्ये ही मतदानाबाबत जागृती करावी.
शिर्डी लोकसभेत १७०८ मतदान केंद्र : १६ लाख ६० हजार मतदार : ८४२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा असे ६ विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. या लोकसभा मतदार संघात १६ लाख ७० हजार १४५ मतदार असून १७०८ मतदान केंद्र आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ६४.५० टक्के मतदान झाले होते. २०२४ मध्ये ७५ टक्के मतदानाचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेब कॉस्टींग केली जाणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिर्डी मतदार संघात जानेवारी २०२४ पासून सीआरपीसी १०७, १०९ व ११०, एमपीडीए तसेच इतर प्रतिबंधात्मक कलमा अंतर्गत ८४२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास १८ एप्रिल २०२४ पासून सुरूवात होणार आहे. २५ एप्रिल २०२४ अंतिम तारीख आहे. २६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. २९ एप्रिल अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. १३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती श्री.कोळेकर यांनी यावेळी दिली.
- Advertisement -