अहमदनगर प्रतिनिधी – ३० जून रोजी निवृत्त झालेल्या
सौ.ज्योती सिताराम परदेशी या शिक्षिकेने त्यांच्या
सेवा निवृत्तीच्या निमित्ताने एक वेगळा पायंडा पाडला आहे .
स्वतःचे कोड – कौतुक करून घेण्याऐवजी सरकारी शाळांमधील ५ प्रयोगशील शिक्षकांचा सन्मान त्यानी उद्या दि.३ रोजी आयोजित केला आहे.यावेळी कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व आप्त स्वकीयाना त्यांनी पुष्पगुच्छ,शाली किंवा भेटवस्तू न आणता वंचित मुलांच्या शिक्षणासाठी वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य मागितले आहे .
भिंगार मध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिकेच्या उभारणीसाठी त्या यावेळी आर्थिक सहयोग देणार आहेत.तसेच त्यांनी जेथे नोकरी केली,त्या शाळेला प्रिंटर आणि इतर शिक्षण साहित्य कृतज्ञता म्हणून त्या देणार आहेत.उद्या सकाळी ११ वाजता भिंगार मधील वृंदावन मंगल कार्यालय येथे त्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजिला आहे.
३८ वर्षे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधून सौ.परदेशी अध्यापन करीत होत्या.अकोले तालुक्यातील आदिवासी समूहाच्या घाटघर ते दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड करणाऱ्या समूहांतील मुलांसाठी या सावित्रीच्या लेकीने तळमळीने शिकविले.
उंबरे (ता.राहुरी )येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक नारायण मंगलारप, नारायण डोह (ता.नगर) येथील संतोष विश्वनाथ ढगे, अहमदनगर महापालिकेच्या गजराजनगर शाळेचा कायाकल्प करणारे भाऊसाहेब कबाडी, अगदी झोपडपट्टीतील मुलांना उच्चकोटीचे वारली चित्रकार बनवणारे भिंगार छावणी परिषदेच्या शाळेतील कलाशिक्षक अरविंद कुडिया,भिंगारमध्ये झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत श्रीमती सय्यद गुलनाझ युसुफ, यांना त्यांच्या शैक्षणिक कामाकरीता आर्थिक सहयोग देऊन सन्मानित केले जाईल.
भिंगार येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक 24 x 7 अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा संकल्प स्नेहालयने केला.नगर मधील नामांकित वकील स्व.उमाकांत पुणेकर,श्रीमती सुधा आणि श्री.अविनाश पुणेकर यांच्या परिवाराने (अहिल्यादेवी चौक, भिंगार येथे ) त्यासाठी जागा दिली आहे.
त्याच्या उभारणीसाठी या निमित्ताने सौ.परदेशी सर्वप्रथम आर्थिक सहयोग देतील.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेत पदवीधर आणि तरुणांचे प्रश्न मांडणारे सजग आमदार डॉ.सुधीर तांबे उपस्थित राहतील.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे येणार आहेत.
सकाळी 10.30 वाजताअहिल्यादेवी चौक (भिंगार) येथे
स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिकेचे भूमिपूजन होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन स्नेहालय परिवार आणि भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक संघाने संयुक्तपणे केले आहे.