निसर्गपाल म्हणून अजीवन काम करण्याची विविध क्षेत्रातील नागरिकांची तयारी
लोकभज्ञाक चळवळीच्या पुढाकाराने ऑपरेशन ग्लोबल वॉर्मिंग डिच्चू फत्ते आंदोलन जारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वार्मिंगचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी निसर्गपाल होण्याची आणि निसर्गपाल म्हणून अजीवन काम करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी लोकभज्ञाक चळवळीच्या पुढाकाराने ऑपरेशन ग्लोबल वॉर्मिंग डिच्चू फत्ते आंदोलन जारी करण्यात आली असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
यंदा मान्सूनचा चांगला पाऊस होणार आहे. त्याचा फायदा सर्वांनी घेणे आवश्यक आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग विरुद्ध झाडे लावणे, सोलर ऊर्जेचा वापर करणे त्याशिवाय ऊर्जेची बचत करणे इत्यादी गोष्टी अत्यंत आवश्यक आहे . ग्लोबल वॉर्मिंग डिच्चू फत्ते आंदोलनाच्या माध्यमातून निसर्गपाल होण्यासाठी पहिल्या टप्प्यात अहमदनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अनिल सरोदे, उपाध्यक्ष संदीप वांढेकर, कॉ. बाबा आरगडे, डॉ. महेबूब शेख, जेष्ठ पत्रकार धीरज वाटेकर, लेखक डॉ. संजय गोर्डे, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे अशोक सब्बन, ॲड. नामदेव दरंदले, ॲड. बाळासाहेब पवार, मनसुख गांधी, प्रा. माधवराव देसाई, वीरबहादूर प्रजापती, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, दिव्यांग संघटनेचे ॲड. लक्ष्मण पोकळे, ओम कदम, हनुमंत शिंदे, ललिता गवळी, शिल्पा कुलथे, अशोक कुलकर्णी, ॲड. सुनील भागवत, ॲड. समीर पटेल, ॲड. राजेश कावरे, ॲड. बबन सरोदे, ॲड. सारस क्षेत्रे, ॲड. कारभारी गवळी यांनी पुढाकार घेतला आहे.
प्रत्येकाने आपल्या बंगल्याच्या आवारात नॅनो धनराई उभी करणे, आपल्या वस्तीतील किमान 50 शेतकऱ्यांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेणे इत्यादी बाबी निसर्ग पालकांनी करण्याचे स्वतःहून स्वीकारले आहे. देशात सरकारवर अवलंबून राहण्याची लोकांची प्रवृत्ती आहे. भ्रष्टाचार, अनागोंदी यामध्ये सरकार आणि नोकरशाही आकंठ बुडालेली आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न जगभर हळूहळू वाढत जाणार आणि त्यातून जैवविविधतेला मोठा प्रमाणात धोका निर्माण होणार आहे. बिबट्या शहरात कुच करत आहे. नागरिकांनी पुढे येऊन ऑपरेशन ग्लोबल वॉर्मिंग डिच्चू फत्ते हे व्यापक स्वरूपातील आंदोलन सुरू केले असून, त्याचा विस्तार करण्याचा मानस आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
आज पर्यंत मानव जातीने परमेश्वराचा शोध कर्मकांड आणि मूर्ती पूजेतून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु परमेश्वराचे अस्तित्व सजीव सृष्टीच्या सळसळत्या चैतन्यामध्ये आहे. ही बाब लोकभज्ञाक चळवळीने लोकांसमोर आणली आहे. गेली 5 हजार वर्षे भारतीय मानसशास्त्र आणि तत्वज्ञानामध्ये भक्ती, ज्ञान, कर्म या बाबींचा पुरस्कार करण्यात आला. त्यातून सजीव सृष्टी वाचवण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीने पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक समृध्दी टिकली पाहिजे, अन्यथा डायनासोर प्रमाणे सर्व सजीव सृष्टी आणि मानवजात देखील नष्ट होणार असल्याचा धोका वर्तविला आहे. सजीव सृष्टी वाचविण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.