नीतीमूल्ये व संस्कारांची शिकवण देणारा बालकविता संग्रह : आनंदाने गाऊया

- Advertisement -

नीतीमूल्ये व संस्कारांची शिकवण देणारा बालकविता संग्रह : आनंदाने गाऊया

नुकताच डॉ.सुदर्शन धस यांचा आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह हाती पडला. अतिशय देखणा असा हा कवितासंग्रह उच्च निर्मितीमूल्य दर्शविणारा बालकविता संग्रह आहे. पानांचा दर्जा, बालवाचकांच्या दृष्टीने अक्षरांची रचना, चित्रांची मांडणी अतिशय सुंदर आहे. हातात पडतात क्षणी हा बालकविता संग्रह आपले लक्ष वेधून घेतो. हा बालकविता संग्रह ऋतू प्रकाशन अहमदनगर यांनी प्रकाशित केलेला असून या बालकविता संग्रहातील चित्रे व मुखपृष्ठ संतोष कदम यांनी रेखाटले आहे. तसेच या कवितासंग्रहाची पाठराखण केली आहे साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेते प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी.
डॉ. सुदर्शन धस हे बालसाहित्यातील एक दमदार नाव. आपल्या आश्‍वासक लेखणीने बालसाहित्यात मोलाचे योगदान देणारे डॉ. सुदर्शन धस बालमनात आपले स्थान पक्के केलेले बालकवी आहेत.ते स्वतः शिक्षक व गीतकार असून आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह घेऊन ते आता बालवाचकांसमोर आले आहेत.
हा बालकविता संग्रह फक्त गुणगुणण्यासाठी किंवा नुसता वाचण्यासाठी नसून तो आपल्या अंगी बाणविण्यासाठीही आहे हे तितकेच महत्त्वाचे. यातील प्रत्येक कवितेतून जीवनावश्‍यक नीतिमूल्यांचे धडे कवीने आपल्याला दिलेले आहेत. सामाजिक भान जपताना आदर्श जगण्याची संकल्पना कवीने आपल्या बालसुलभ कवितांमधून सुंदररित्या मांडलेली आहे. पुस्तकांचे शीर्षक असणारी आनंदने गाऊया ही अशीच एक कविता.
वादळवारे येवो जीवनी, पर्वा तयाची कोणाला
एकदिलाने जगणे अपुले, मदत करूया जगताला!
ही कविता वाचता क्षणी आपल्या लक्षात येते की या कवितेला लय आणि ताल आहे. त्याचबरोबर या कवितेमधून जगण्यातील मूल्ये,जीवनावश्‍यक ध्येय आणि आपल्या जीवनामध्ये अखंडपणे उभी राहणारी आव्हाने यांची ओळख कवीने आपल्याला अगदी सहजपणाने या कवितेमधून करून दिलेली आहे.
वाघाची दिवाळी ही कविता थोड्याशा वेगळ्या अंगाने लिहिलेली आहे. प्राणी आणि माणूस यांच्यातील अनोखे नाते या कवितेतून कवी बालवाचकांसमोर मांडताना कवी म्हणतात,
दिवाळीच्या दिवशी आला, वाघ आमच्या गावात
डरकाळी फोडून पुन्हा, हसला मस्त गालात
माणसाचे प्राणी विश्‍वशी असणारे नाते माणसाने जपले पाहिजे. आपल्या विकासाबरोबर प्राण्यांचेही संवर्धन केले पाहिजे. हे साध्या सोप्या पद्धतीने पटवून देताना वाघ दिवाळीसाठी आपल्याकडे आला असताना त्याची कशी सरबराई केली जाते. ते या कवितेतून कवीने मांडलेले आहे.
अगदी साध्या सोप्या शब्दात कवितेतून आपले विचार मांडताना कवी नकळतपणे बालमनावर हवे ते सुसंस्कार घडवून आणण्याचे अवजड शिवधनुष्य या ठिकाणी पेलताना दिसतात आणि त्यामध्ये ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत.
डॉक्टर सुदर्शन धस अभ्यासू आणि उच्चशिक्षित कवी असल्याने त्यांच्या कवितेला अभ्यासाचा एक भक्कम असा पाया आहे. त्यांच्या कवितेला वास्तववादाची एक वेगळी चौकट प्राप्त झालेली आहे. ते आपल्या कवितांमधून प्रतिमा आणि प्रतीकांची पेरणी करताना आपल्याला त्यांच्या प्रतिभेची चुणूकसुद्धा दाखवून देतात.
या कवितासंग्रहातील  मामाचं गाव अशीच एक सुंदर कविता. मामाचा गाव प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे. हल्लीच्या काळामध्ये मामाही बदललाय आणि मामाचं गाव सुद्धा बदलले आहे. परंतु या बालसंग्रहातील ही कविता आपल्याला विसरत चाललेल्या मामाच्या गावाची आठवण करून देते. आणि आपल्या मनातून हद्दपार होत चाललेले ते सुंदर क्षण पुन्हा एकदा प्रभावीपणे आपल्यासमोर उभे करते.
वैज्ञानिक दृष्टिकोनाची संकल्पना स्पष्ट करणारी आणि विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारी शिलेदार ही कविता सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. ही कविता वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ करण्याचा आपल्याला अमूल्य सल्ला देते. त्याचबरोबर अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विज्ञानाचा प्रसार करण्याचे वचनसुद्धा या कवितेतून कवी आपल्याकडून घेतात.
जाऊ तेथे करू आम्ही, विज्ञानाचा पुरस्कार
अंधश्रद्धा नको आता, युग नवे करू साकार
या कवितासंग्रहात अशा एकूण 47 कविता आहेत. सर्वच कविता वेगवेगळ्या विषयांच्या वेध घेता घेता मोलाचा संदेश देवून जातात. अशा पद्धतीने कवीने आनंदाने कसे जगावे हे आपल्या बालकवितांमधून बालवाचकांसमोर मांडलेले आहे. आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. बालमनाची योग्य जडणघडण करत सहज गुणगुणता येणारा हा कवितासंग्रह प्रत्येकाला आनंदाने जगण्याची मोठी शिकवण देऊन जातो. त्या दृष्टीने या कवितासंग्रहाचे महत्त्व फार मोठे आहे. बालवाचकांसाठी अतिशय संस्कारक्षम कवितासंग्रह दिल्याबद्दल डॉ.सुदर्शन धस यांचे मन:पूर्वक धन्यवाद. त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव – आनंदाने गाऊया
कवी- डॉ. सुदर्शन चंद्रशेखर धस
प्रकाशक- ऋतू प्रकाशन, अहमदनगर.
पृष्ठे- 64, मूल्य- 120 रु., मुखपृष्ठ- श्री. संतोष कदम.
ग्रंथ समीक्षण -उत्तम सदाकाळ (प्रसिद्ध बाल साहित्यिक व लेखक, कवी)
(शिवजन्मभूमी जुन्नर 9011016655)
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!