शेवगाव प्रतिनिधी
सोमवार दि.३० रोजीच्या मध्यरात्री व मंगळवार दि.३१ रोजीच्या सकाळी शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने भरपाई करा अशा आशयाचे निवेदन जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी आज भगूर येथे तहसिलदार अर्चना पागीरे/भाकड यांना दिले. यावेळी जनशक्तीचे जगन्नाथ गावडे, राजेंद्र पोटफोडे, सरपंच वैभव पूरनाळे, दिनेश मुरदारे, सुरज मुजमुले, राधाकिसन आंधळे, दिपक पूरनाळे, नागेश पूरनाळे, नवनाथ जायभाये, मयूर मुजमुले, दादासाहेब पूरनाळे, रज्जाकभाई शेख, राजेंद्र गरुड आदि यावेळी उपस्थित होते.
यावेळी निवेदनात पुढे म्हंटले आहे की, शेवगाव-पाथर्डी तालुक्यामध्ये दि.३० रोजी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे विविध नद्यांना पूर येऊन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, दूध उत्पादकांचे व हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करून पंचनाम्याच्या नकला पिडितांना लगेच द्याव्यात. ज्या ज्या नागरिकांची घरे पाण्याच्या प्रवाहामुळे कमकुवत झाली अथवा पडले आहेत अशा पिडीत नागरिकांसाठी नव्याने घरकुल देण्यात यावीत. दुग्ध व्यवसायिकांना नुकसान भरपाई म्हणून दुभती जनावरे व चारा तातडीने देण्यात यावा. शेतीचे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई तातडीने मिळवून द्यावी. पिडितांना कोणतेही निकष न लावता शासकीय कोट्यातून तात्काळ धान्य देण्यात यावेत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या भिजलेल्या मालाऐवजी दुसऱ्या चांगल्या मालाचा पुरवठा करण्यात यावा. अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.