नेवासा डेपोतील भोंगळ कारभारामुळे कर्मचारी, प्रवाशांना डोकेदुखी

नेवासा डेपोतील भोंगळ कारभारामुळे कर्मचारी, प्रवाशांना डोकेदुखी

नेवासा फाटा (प्रतिनिधी) – राज्य परिवहन महामंडळाच्या नेवासा आगार प्रमुखांच्या मनमानी, भोंगळ कारभारामुळे कर्मचारी, प्रवासी पुरते त्रस्त झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष कमलेश गायकवाड आणि सचिव विष्णू घुले यांनी संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गायकवाड आणि घुले यांनी म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागातील नेवासा हे अत्यंत महत्त्वाचा तसेच महामंडळाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून देणारे आगार आहे. नेवासा तालुक्यातील जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर, संत ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनिराज मंदिर, म्हाळसा खंडोबा मंदिर, श्री क्षेत्र देवगड आदी देवस्थानांना धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने दररोज हजारो भाविक येत असतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील शिर्डी, मढी, मोहटादेवी, आदी देवस्थानांना जाण्यासाठी नेवासा आगराचा सर्रास वापर केला जात असल्याकडे त्यांनी यात लक्ष वेधले आहे. एसटीच्या संभाजीनगर – शिर्डी, त्रिंबकेश्र्वर – परळी, परळी – त्रिंबकेश्र्वर, नेवासा – शनिशिंगणापूर, नेवासा – मोहटादेवी, नेवासा – देवगड या चालविण्यात येत असलेल्या फेऱ्या विशेष लोकप्रिय असल्याचा दावा गायकवाड आणि घुले यांनी सदर पत्रकात केला आहे. या सर्व फेऱ्यांच्या चालक – वाहकांत बदल नेवासा आगारात होत असून प्रवाशांनी भरलेली बस असताना तपासणीच्या नावाखाली प्रवाशांना खाली उतरवून देत डेपोत नेली जाते. गाडीची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना परत बसवून नंतर मार्गस्थ केली जात असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

मात्र या दरम्यानच्या मधल्या कालावधीत प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची चीड त्यांनी यात व्यक्त केली आहे. डेपोत गाडी नेण्यापूर्वी प्रवाशांना थांबण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने उघड्यावरच उतरवून दिले जात असल्याने प्रामुख्याने महिला प्रवासी व त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांचे हाल होत असल्याचा आरोप गायकवाड आणि घुले यांनी केला आहे. गाडी तपासणीसाठी नेण्यापुर्वी आगारच्या प्रवेशद्वारात उतरवून देण्यात आलेल्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छता गृहाची सोय नसल्याने प्रामुख्याने महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. व्यवस्थापनाच्या या भोंगळ कारभाराचा एस टी कर्मचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांनी याद्वारे निदर्शनास आणून दिली आहे. बहुतांश बस गाड्यांमध्ये चालकांना देण्यात आलेले स्पेअर टायर दुरुस्त केलेले नसतात. त्यामुळे रस्त्यातच खोळंबा होऊन तिष्ठत राहण्याची वारंवार वेळ ओढवत असल्याने चालक – वाहकांना प्रवाशांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याची नामुष्कीकडे गायकवाड आणि घुले यांनी लक्ष वेधले आहे. आगार व्यवस्थापकांनी त्यांच्या मनमानी तसेच भोंगळ कारभारात बदल करून आगारात तपासणीच्या नावाखाली उतरवून दिलेल्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी, तसेच राज्य परिवहन कर्मचाऱ्यांशी समनवयात्मक मार्गातून संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांनाही दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!