नेवासा प्रतिनिधी – कमलेश गायकवाड
गेली वर्षानुवर्षे प्रचंड तक्रारी आल्यानंतर अखेर पोलीसांनी नेवासा फाट्यावरील वेश्या व्यवसायावर नियोजनबद्धरित्या मोठ्या फौजफाट्यासह छापे टाकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या सात महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते.
नेवासा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेलबरोबरच लॉजिंगचे पेव फुटल्यानंतर गेल्या काही वर्षांत अनैतिक व्यवसायांनी उच्छाद मांडल्याचे दिसून येत होते. शेकड्यानी महिलांनी या अनैतिक व्यवसायाच्या निमित्ताने या परिसरातील लॉजिंग व्यावसायिकांशी संधान साधले होते. त्यामुळे नेवासा फाटा परिसर वेश्या व्यवसायाचे ‘हब’ बनल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन लांबलांबून आंबट शौकीनांची गर्दी होत असल्याने या परिसराला दररोजच जत्रेचे स्वरुप येत होते. व्यसनी, रंगेल लोकांचा कायम राबता वाढल्याने ग्रामस्थ, प्रवासी महिला व विद्यार्थीनींना याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र या माध्यमातून दिवसाकाठी मोठे अर्थकारण फिरत असल्याने तसेच लॉज व्यावसायिक सर्वच यंत्रणा मॅनेज करत असल्याने वेळोवेळी तक्रारी करुनही यावर कारवाई होत नव्हती.
याबाबतची माहिती प्रत्यक्ष जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी स्वतःची यंत्रणा वापरुन नेवासा फाट्यावरील या अनैतिक व्यवसायाची इत्तंभूत माहिती काढली. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय नेवासा फाटा परिसरात फोफावलेला असल्याने एकाचवेळी सर्वत्र छापे टाकण्यासाठी एकाच पोलीस ठाण्यातील उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विसंबून चालणार नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, नेवासा पोलीस ठाण्याचे विजय करे, शेवगाव पोलीस ठाण्याचे विलास पुजारी, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चौधरी, आदी सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके बनवत सापळा रचला. या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रचंड दक्षता घेऊन तसेच गुप्तता पाळूनही छाप्याची खबर लीक झाल्यामुळे त्यांच्या हाती विशेष काही लागले नसल्याची चर्चा जाणकारांत रंगली आहे.
या कारवाईत वेश्या व्यवसाय करणाऱ्या सहा परप्रांतीय तर एका महाराष्ट्रीयन महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. नेवासा फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथून तीन मुली, हॉटेल नामगंगा येथून तीन मुली तर हॉटेल पायलमधून एका मुलीला ताब्यात घेण्यात आले. या सर्व पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.