अहमदनगर प्रतिनिधी – दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद देखणे यांना महापालिकेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या चुकीच्या नोटीसीसंदर्भात सर्वच दैनिकांचे प्रमुख, पत्रकार, छायाचित्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांनी अहमदनगर प्रेस क्लबच्या माध्यमातून मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्त शंकरराव गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित हेही उपस्थित होते. झालेल्या प्रकाराबद्दल आयुक्तांनी दिलगीरी व्यक्त केली. याशिवाय मनपाच्या संबंधीत आरोग्य अधिकार्यास नोटीस काढतानाच मिलींद देखणे यांच्याकडे संबंधीत आरोग्य अधिकार्याने माफीनामा सादर केला. सदरचे वादग्रस्त पत्र मागे घेत असल्याचे त्यांनी त्या पत्रात म्हटले असून झालेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात मा. जिल्हाधिकारी भोसले साहेब यांनीही नोटीस चुकीच्या पद्धतीने दिली असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारात ही नोटीस बाधा आणणारी असल्याकडे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अत्यंत महत्वाची भूमिका या प्रकरणात निभावली.