शेवगाव प्रतिनिधी – हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलेले हवामान अंदाज हे शेतकर्यांच्या हिताचे व अचूक असतात. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या हवामान विभागात समाविष्ट करून घ्यावे अशा आशयाचे निवेदन जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना ईमेलद्वारे देण्यात आले.
निवेदनावर जि.प.सदस्या हर्षदाताई काकडे, जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, महासचिव जगन्नाथ गावडे, शहराध्यक्ष सुनिल काकडे, विनोद मोहिते, सुरेश चौधरी, आबासाहेब राउत, राजेंद्र पोटफोडे, सचिन आधाट, भाऊसाहेब सातपुते, म्हातारदेव आव्हाड, विष्णू दिवटे, भारत भालेराव, देविदास गिर्हे आदि पदाधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज अतिशय महत्वाचा असतो. पीक नियोजनाचं भवितव्य पावसाच्या अंदाजावर अवलंबून असते. हवामान खात्याने लावलेले पावसाचे अंदाज कधीकधी जुळत नाही. हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातला शेतकरी पिकांचे नियोजन करत असतो.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नैसर्गिक संकटांचा सामना करणे सोपे जात आहे.
पाऊस कधी व किती पडणार याचा डख यांनी वर्तविलेला अंदाज शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतो आहे.एकवेळ हवामान विभाग चुकेलं पण पंजाबराव डख नाहीत अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. म्हणून शासकीय हवामान खात्यामध्ये त्यांना सामाविष्ट करण्यात यावे.जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या अचूक अंदाजाचा लाभ होईल असेही निवेदनात म्हटले आहे.