पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील
शेवगाव (प्रतिनिधी)
देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वातावरण आहे आणि जनतेना त्यांच्याच बाजूने कौल देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येत्या ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगर जिल्ह्यात येणार आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीचा मेळावा सुरू असताना महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या प्रचार सभांची गती वाढवली आहे. महायुतीच्यावतीने शेवगांव तालुक्यातील घोटन येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले याच्यासह, नरोडे काका, अंबादास कळमकर, संजय कोळगे, बबन भुसारी आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी आणि भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विखे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाचा गतीमान विकास केला आहे. अनेक योजनांच्या मार्फत त्यांनी तळागळातील लोकांचा विकास करून दाखविला असून ३० कोटीहून अधिक लोकांना गरिबीतून मुक्त केले. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली आहे. यामुळे देशा परदेशातून अनेक नामांकित कंपन्या भारतात गुंतवणुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत केले. यामुळे आज जगात भारताचा डंका वाजत आहे. येणाऱ्या काळात विकसीत भारताचे स्वप्न त्यांनी देशाला दिले आहे. यामुळे मोदींच्या हमीवर देशातील नागरिकांचा विश्वास असल्याने तिसऱ्यांदा त्यांनाच पंतप्रधान पदावर बसविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुमचे प्रत्येक मत हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. यामुळे विचारपुर्वक मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार चंद्रशेखर घुले यांनी सुद्धा कार्यकत्यांना संबोधित केले, आ. घुले यांनी सांगितले की, देशाला कणखर नेतृत्व देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशात कुठलाही पर्याय नाही. यामुळे महायुतीचा उमेदवाराला विजयी करणे आवश्यक आहे. खा. डॉ. सुजय विखे ह्यांनी मागील पाच वर्षात आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. यामुळे नगरच्या विकासासाठी ते पंतप्रधान मोदींच्या टीम मध्ये आवश्यक आहे. यामुळे येत्या १३ मे रोजी कमळाचे बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.