पांढरीपुल येथील त्या गुन्हेगारी कुटुंबीयांवर तडीपारची कारवाई व्हावी
सह्याद्री छावा संघटनेची मागणी
तडीपारच्या प्रस्तावात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या पांढरीपुल येथील पालवे कुटुंबातील सदस्यांवर तडीपारची कारवाई करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तर सदर प्रकरणात तडीपारच्या प्रस्तावात वशिलेबाजी करुन दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करुन याप्रकरणी खातेनिहाय चौकशी करुन दोषींवर कारवाई होण्यासाठी प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी 14 जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पांढरीपुल येथील पालवे कुटुंबातील सदस्य सराईत गुंड असून, त्यांच्यावर पाथर्डी, राहुरी, सोनई व एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पालवे कुटुंबातील गुंड प्रवृत्तीच्या सदस्यांवर सावकारी करणे, मारहाण करणे, रस्ता लूट, घरात घुसून मारहाण करणे, जमिनी बळकाविणे, अवैध दारू विक्री, अवैध व्यवसाय आदी अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. प्रशासनाकडून गुन्हेगार यांना पाठबळ मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाईस विलंब होत आहे. संबंधित पोलीस स्टेशन त्यांच्याकडे जाणून बुजून कानडोळा करत आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अवैध व्यवसायाचा बंदोबस्त करावा, त्यास पाठबळ देणारे अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करुन तडीपारचा प्रस्तावाला विलंब लावणाऱ्या व टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस महासंचालक यांच्याकडे ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.