पाचवे काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल डोंगरे यांचा गौरव
ग्रामीण भागातील साहित्यिक कवींना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य – अलकाताई मुंदडा
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांचा प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, विद्या बडवे, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा अनिता काळे, प्रयासच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा कुसुम सिंग, उपाध्यक्ष कविता दरंदले, सचिव शकुंतला जाधव, ज्योत्स्ना कुलकर्णी, विद्या बडवे, खजिनदार मेघना मुनोत, संचालिका रजनी भंडारी, छाया राजपूत, प्रतिभा भिसे, वंदना गोसावी, सुरेखा बारस्कर, सुजाता पुजारी, सोनी पूरनाळे, अर्चना बोरुडे, लता कांबळे, स्मिता वाल्हेकर, अंबिका भिसे आदी उपस्थित होत्या.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जागृती करुन नवोदित व ज्येष्ठ कवींना व्यासपिठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल डोंगरे यांचा सत्कार पार पडला.
अलकाताई मुंदडा म्हणाल्या की, ग्रामीण भागातील साहित्यिक कवींना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले आहे. पै. नाना डोंगरे निस्वार्थ भावनेने सामाजिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे. सातत्याने धडपड करणारे व विविध उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अनिता काळे यांनी काव्य संमेलनाचे संयोजक डोंगरे यांचे तळमळीने सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.
या काव्य संमेलनात राज्यातील नवोदित व ज्येष्ठ कवींनी सहभाग नोंदविला होता. कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवून, कवींनी सामाजिक व्यथा मांडल्या. एकापेक्षा एक सरस कवितांचे सादरीकरण यावेळी झाले. संमेलनात सहभागी झालेल्या कवींचा यावेळी सन्मान करण्यात आला.