वराह पालन करणार्या समाजबांधवांवर उपासमारीची वेळ
डुक्करे पकडून तो अधिकारी त्यांची परस्पर विक्री करत असल्याचा आरोप
अहमदनगर प्रतिनिधी – कैकाडी, वडारी व कोल्हाटी समाजाच्या वतीने वराहपालन करण्यात येत असलेल्या पाचशे वराह (डुक्करांची) पळवून नेणार्या जामखेड नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जामखेड तालुक्यातील कैकाडी, वडारी व कोल्हाटी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. तर मुख्य सचिवांना नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती अॅड. शिवाजी डमाळे यांनी दिली. सदर अधिकारी वराह पकडून त्याची परस्पर विक्री करत असल्याचा आरोप समाजबांधवांनी केला आहे. तर या प्रकारामुळे उदरनिर्वाहाचे साधनावर गडांतर आले असून, कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमीहिन असलेले कैकाडी, वडारी व कोल्हाटी समाज बांधव उदरनिर्वाहासाठी वराह पालनचा व्यवसाय वंश परंपरागत करीत आहे. जामखेड नगर परिषदेतील मुख्यअधिकारी म्हणून कार्यरत असणार्या व्यक्तीने कायदा हातात घेऊन वराह पालन करणार्या बांधवांच्या जगण्याचा मुलभुत अधिकारावर गडांतर आनले आहे. सदर अधिकारीने कोणतीही पुर्वसुचना न देता दि.२९ सप्टेंबर रोजी अज्ञात लोकांची टोळी आणून पाचशे वराह पकडून नेले.
सहा महिन्यापुर्वी याच अधिकार्याने पंधराशे वराह पकडून नेले होते. त्याने चाळीस ते तीस लाख रुपयात पुणे येथे त्याची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि.३० सप्टेंबर रोजी एका विधवा महिलेचे बळजबरीने चार ते पाच वराह पकडून नेले असता, सदर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सदर अधिकारी वराह पकडण्याच्या नावाखाली समाजबांधवांचा रोजी-रोटीचा हक्क हिरावत आहे. सदर प्रश्नी जामखेडच्या प्रशासकीय पातळीवर बैठक देखील घेण्यात आली.
ज्याप्रमाणे शेतकरी मेंढ्या, शेळी पालन करतात. त्याप्रमाणे कैकाडी, वडारी व कोल्हाटी समाजातील काही लोक उदरनिर्वाहासाठी वराहचे पालन करतात. वराह हा पाळीव प्राणी आहे. या प्रश्नी जामखेडचे पोलिस निरीक्षक, तहसिलदार यांनी सदर अधिकार्यास समजावून सांगितले असतानाही त्या अधिकारीचा वराह पकडण्याचा प्रकार सुरु आहे.
वराहची बळजबरीचे चोरी करणार्या अधिकारीवर कलम ३८२, ३७९, ३९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी व दिवाणी न्यायालयात नुकसान भरवाई मिळण्यासाठी कैकाडी, वडारी व कोल्हाटी समाजाच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
तर अॅड. शिवाजी डमाळे यांच्या वतीने सदर अधिकारीवर फौजदारी कारवाई होण्यासाठी मुख्य सचिवांना नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटीसवर अजिनाथ जाधव, सुरेश गायकवाड, बाबा गायकवाड, हनुमंत विटकर, शिवाजी विटकर, दत्ता शिंदे, संजय विटकर, योगेश पवार, विजय विटकर, दत्ता पवार आदी समाजबांधवांच्या स्वाक्षर्या व अंगठे आहेत.