श्री संत सावता माळी युवक संघाचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांना निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी – नगर तालुक्यातील पिंपळगांव माळवी तलाव गेल्या दोन वर्षांपासून पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरत असल्याने सांडव्यावरुन पाणी पडत आहे. हे पडणारे पाणी रहदारीच्या रस्त्यावरुन वाहत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या पाण्याला पाईपलाईन द्वारे मार्गस्थ करावे.
या मागणीचे निवेदन श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांना देण्यात आले.
याप्रसंगी संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, दिपक खेडकर, दिपक साखरे, गौरव विधाते, डॉ.सुदर्शन गोरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोक तुपे म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्याने पिंपळगांव माळवी तलाव पुर्ण क्षमतेने भरुन वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यावरुन वाहणारे पाणी हे रस्त्यावरुन पुढे जाते.
या रस्त्यावरुन परिसरातील अनेक गावातील नागरिकांची ये-जा असते. पाणी वाढल्यानंतर या गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तेव्हा या रस्त्यावरुन जाणार्या पाण्यास पाईपलाईनद्वारे मार्गस्थ करावे किंवा या ठिकाणी असलेल्या दगडी पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे, असे अशोक तुपे यांनी सांगितले.