पै. लोणारे याने पटकाविली शिरापूर केसरीची चांदीची गदा
जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे पैलवान अनिल लोणारे यांनी चितपट कुस्ती करुन शिरापूर केसरीची चांदीची गदा पटकाविली. शिरापूर (ता. पारनेर) येथील गावाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पै. लोणारे यांची कुस्ती अशोक पालवे (ता. श्रीगोंदा) यांच्यात झाली. रंगलेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये लोणारे याने पालवे यास आसमान दाखविले.
ग्रामस्थांच्या वतीने विजयी पैलवान लोणारे यांना चांदीची गदा व रोख बक्षीस देण्यात आले. शिरापूरच्या यात्रेनिमित्त लाल मातीच्या आखाड्यात थरारक कुस्त्या रंगल्या होत्या. यावेळी जिल्ह्यासह राज्यातील नामवंत मल्लांनी यामध्ये सहभाग नोंदवला. उत्साहपूर्ण वातावरणात युवा मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या.
पै. अनिल लोणार हा वाघुली (ता. पाथर्डी) येथील असून, तो जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पै. भाऊसाहेब धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्याने विजय संपादन करुन शिरापूर केसरीची चांदीची गदा मिळवल्याबद्दल कुस्ती संकुलात त्याचा धावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.