हायवेवरील अस्ताव्यस्त उभ्या वाहनांच्या चालकांसह व्यावसायिकांना दिली समज
नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पोलीस निरीक्षक विजय करे यांनी आज सकाळी नेवासा फाटा परिसरातील राजमुद्रा चौक,आंबेडकर चौक या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणारी तसेच हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची रस्त्यावर अस्ताव्यस्त
उभ्या वाहनांवर कारवाई करत वाहन चालक तसेच व्यावसायिकांना खरमरीत भाषेत समज दिल्यानंतर थोड्याच वेळात या संपूर्ण परिसराचा कोंडलेला श्वास मोकळा झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
नगर-औरंगाबाद महामार्गावरील विकसित असे नेवासा फाटा परिसराला शहराचे स्वरुप प्राप्त झाले असून या ठिकाणी सकाळच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणावर नगर,औरंगाबाद, श्रीरामपूर,नाशिक, शेवगांव,पाथर्डीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची विशेषतः नोकरदार वर्गांबरोबरच व्यावसायिक तसेच त्यांच्या ग्राहकांची तुंबळ गर्दी झालेली असते.
यावेळी प्रवासी वाहतुक करणारी वाहने महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी होत असल्याचे चित्र नित्याचेच बनले आहे.प्रवाशांना तासनतास तिष्ठत राहून नेवासा फाटा परिसरात वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागत होता.याबाबत यापूर्वीही विविध राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवूनही कारवाई होत नव्हती.
सोमवारी सकाळी पोलीस निरीक्षक विजय करे तसेच कर्मचारी श्याम गुंजाळ,राहुल यादव,वाहतुक विभागाचे गणेश गलधर वाहन चालक कुऱ्हाडे यांच्या समवेत या परिसरातून जात असताना त्यांच्याच वाहनाला या वाहतुक कोंडीतून रस्ता काढत पुढे जाण्याची वेळ ओढवली.प्रवासी वाहतुक करणारी वाहने तसेच हॉटेल व्यावसायिकांकडे आलेल्या ग्राहकांची वाहने अस्ताव्यस्त उभी केल्यामुळेच वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे विदारक चित्र पाहून संतापलेल्या पोलीस निरीक्षक करे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून प्रवासी वाहतुकीच्या वाहन चालकांसह हॉटेल व्यावसायिकांची खरडपट्टी केली.
तसेच यानंतर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने अस्ताव्यस्त वाहने उभी केल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांच्यात चांगलीच खळबळ उडाली.पोलीस निरीक्षक करे यांच्या दट्ट्यानंतर अवघ्या काही क्षणांत पळापळ होऊन जणू महामार्ग व नेवासा फाटा परिसराचा कोंडलेला श्वास मोकळा झाल्याचे दिसून आल्याने प्रवाशांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
कठोर कारवाई करणार – विजय करे
दुकान किंवा हॉटेलच्या बाहेर अस्ताव्यस्त पार्किंग होणार नाही याची काळजी संबंधितांनी घ्यावी.अन्यथा मी सदरचे दुकान किंवा हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्यात येईल. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी देखील चौकात उभे राहून महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत. चौकाच्या पुढे जाऊन वाहनांत प्रवासी घ्यावेत.जर हॉटेलच्या किंवा एखाद्या व्यावसायिकाच्या समोर वाहने उभा राहून प्रवासी भरताना दिसले किंवा व्यावसायिकाना दमबाजी झाल्यास त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क करावा, दोषींवर कारवाई केली जाईल.