पोलीस संरक्षण द्या, शहरातील अवैध धंदे फेसबुक लाईव्हद्वारे दाखवतो

0
96

सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांची पोलीस अधीक्षकांना निवेदन

तोफखाना,कोतवाली,भिंगार व एमआयडीसी पोलीस चौकी हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप

बंदोबस्त न भेटल्यास पाच दिवसांनी अवैध धंद्यांचा लाईव्ह कार्यक्रम सुरु करण्याचा इशारा

 

अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप करुन, फेसबुक लाईव्हद्वारे सर्व धंदे जनतेला दाखविण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्याची अनोखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

येत्या पाच दिवसात पोलीस बंदोबस्त न मिळाल्यास एकटे जाऊन शहरातील अवैध धंद्यांचा लाईव्ह कार्यक्रम नागरिकांना दाखविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तोफखाना, कोतवाली, भिंगार व एमआयडीसी पोलीस चौकी हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. मटका, जुगार अड्डे, बिंगो सट्टा गेम, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट सट्टा, हॉटेलवर बेकायदा दारूविक्री, गुटखा विक्री असे इतर अनेक अवैध धंदे खुलेआम व राजरोसपणे सुरू आहेत.

त्या सर्व अवैध धंद्यांची कल्पना पोलीस खात्यात सेवा देणार्‍या काही पोलीस कर्मचार्‍यांना आहे. पोलीस कर्मचारी अवैध धंदे, व्यवसाय करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दरमहा हप्ते घेतात व त्यांना अवैध व्यवसाय करण्यास पाठबळ देत असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला आहे.

पोलीस अधिकार्‍यांची दिशाभूल करण्यासाठी 12 अ व 56 ई अंतर्गत मालक सोडून त्यांच्या पंटरवर कारवाई दाखवण्यात येते. परंतु ज्या व्यवसायावर कारवाई दाखवण्यात येते, तो व्यवसाय पुन्हा दुसर्‍या दिवशी सुरू होतो. फक्त प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी मोघम कारवाई दाखवण्यात येते.

शहरातील जनतेलाही हा प्रकार माहित आहे. काही दिवसांपूर्वी भिंगार मधील दोन जुगार क्लबची पोलीसांना माहिती देण्यात आली. त्या दिवशी कारवाई झाली, परंतु दुसर्‍या दिवशी त्यांना हप्ता वाढवून अवैध व्यवसाय करण्यास मोकळीक देण्यात आली. तसेच ऑनलाइन क्रिकेट सट्टा चालक व त्याचे साथीदार कशा प्रकारे सट्टा चालवतात त्याची प्रत्यक्ष भेटून माहिती दिली होती. मात्र गोपनीय एलसीबीच्या अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करून त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. त्याच कारणामुळे नगर शहरात सुरू असणार्‍या सर्व अवैध धंद्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांमार्फत उपलब्ध झाली आहे.

फेसबुक लाईव्ह करुन शहरातील अवैध धंदे दाखवून पोलीस प्रशासन कर्तव्यात कसूर करुन गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तसेच अवैध धंदेवाल्यांना संरक्षण देत असल्याचे दाखवून द्यायचे आहे. हे करत असताना जीवितास धोका असून, अवैध धंदे करणार्‍यांकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस संरक्षण मिळण्याचे भांबरकर यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here