प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लगड्डा यांचा निसर्ग श्रीमंत न्यायाधीश सन्मानाने होणार गौरव
अहमदनगर बार असोसिएशनचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या ओसाड परिसरात हिरवाई फुलविणारे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांना अहमदनगर बार असोसिएशनच्या पुढाकाराने निसर्ग श्रीमंत न्यायाधीश सन्मानाने गौरव केला जाणार असल्याची माहिती वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे व ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
मंगळवार दि. 11 जून रोजी दुपारी 2 वाजता अहमदनगर जिल्हा न्यायालयासमोरील बागेत जिल्हा प्रधान न्यायाधीश यार्लगड्डा यांचा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपाचे आयुक्त पंकज जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत सन्मान होणार आहे.
2017 साली जिल्हा न्यायालयाचे स्थलांतर डीएसपी चौकात नवीन भव्य इमारतीमध्ये करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाच्या भव्य इमारतीच्या परिसरात अजिबात झाडे नव्हती. वकिलांची हजारो वाहने उन्हात ठेवाव्या लागत होत्या. तर येणाऱ्या पक्षकारांना देखील सावलीची सोय नव्हती. पहिल्या दोन वर्षात प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी या संदर्भात काही एक निर्णय केला नाही. परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वी सुधाकर यार्लगड्डा यांची प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्यावर वकील संघटनेच्या सहकार्याने जिल्हा न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात वड, बदाम, कडूलिंब व इतर शेकडो झाडे लावली. दोन वर्षात ही झाडे मोठी झाली असून, यंदाच्या उन्हाळ्यात परिसरामध्ये हिरावाई फुलून गारवा पसरला आहे.
नवीन न्यायालय हिरावाईने फुलवून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणारे न्यायधीश यार्लगड्डा यांच्या सन्मानासाठी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे, ॲड. महेश शेडाळे, ॲड. सुरेश लगड, ॲड. अनिल सरोदे, ॲड. प्रभाकर शहाणे, ॲड. एल.के. गोरे, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. शिवाजी कराळे, ॲड. संजय दराडे, ॲड. बाळासाहेब पवार, ॲड. सुभाष भोर, ॲड. अनिता दिघे, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. जॉन खरात, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. भाऊ अवसरकर, ॲड. रमेश कराळे, ॲड. समीर पटेल, ॲड. राजेश कावरे, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. लक्ष्मण कचरे, ॲड. संजय पाटील, ॲड. वैभव कदम, ॲड. विशाल पठारे, ॲड. संदीप शेंदूरकर, ॲड. अमोल बनकर, ॲड. रावसाहेब बर्डे आदी वकिलांनी पुढाकार घेतला आहे.
भारतात काही ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान 48 अं सेल्सियस पर्यंत गेले. त्यामुळे सर्वत्र मोठी चिंता निर्माण झाली आहे. वकील संघाच्या अनेक सदस्यांनी अजीवन निसर्गपाल म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे. अहमदनगर जिल्हा निसर्ग श्रीमंत झाला पाहिजे आणि लाखोंच्या संख्येने झाडे यंदाच्या पावसाळ्यात लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांसमोर प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचा आदर्श रहावा व सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सूर्यसाक्षी निसर्ग श्रीमंत न्यायाधीश या सन्मानाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घराच्या आवारात, त्याशिवाय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात आणि सरकारी कार्यालयांच्या आवारात मोठ्या संख्येने झाडे लावून ती जगविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. पुढच्या पिढीला निसर्गाचे वरदान टिकून राहिले पाहिजे, यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे ॲड. गवळी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.