कोरोनाची भिती न बाळगता काळजी घ्यावी – हेमा सेलोत
अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनापासून स्वतःचे व कुटुंबीयांचे रक्षण करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.मन, शरीर तंदुरुस्त ठेवून कोरोनाची भिती न बाळगता काळजी घ्यावी.शारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गोपचार हे एक वरदान असून, याचा अवलंब करण्याचे आवाहन निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत यांनी केले.
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महात्मा फुले चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोनाची भिती व घ्यावयाची काळची या विषयावर व्याख्यानात मार्गदर्शन करताना सेलोत बोलत होत्या.यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा,शोभा पोखरणा,उषा गुगळे, सुजाता पूजारा,दीपा मालू आदींसह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना सेलोत म्हणाल्या की, दैनंदिन प्राणायाम, योगा व सकस आहार घेऊन प्रतिकार शक्ती वाढविता येते.कोरोनाने शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होते. यासाठी स्वतःच्या शरीरातील ऑक्सिजन क्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम हा महत्त्वाचा काम करतो.
कोरोना हा साखरप्रिय व्हायरस असून,आहारात अधिक प्रमाणात साखर न घेता खजूर,गोड फळे,मध याचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस,जेष्ठमधाचा वापर करण्याचे सांगितले.कोरोनाला न घाबरता त्याविरोधात लढा देण्याची गरज असून, घाबरल्याने प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी कोरोनाने सर्वच भयभीत झाले असताना महिलांमध्ये असलेली भिती दूर करण्यासाठी व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.
दीपा मालू यांनी महिलांसाठी विविध बौध्दिक स्पर्धा घेतल्या.बौध्दिक,प्रश्नमंजुषा,तंबोला आदी विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
यामध्ये जयश्री पुरोहित, सरस पितळे, स्वाती नागोरी, नंदिनी गांधी,शशीकला झरेकर यांनी बक्षिसे पटकावली.