अहमदनगर प्रतिनिधी – महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीने मुंबई येथे आयोजित पाचव्या अधिवेशनात नगर येथील डॉ शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कूल चे विश्वस्त प्रा. विजय शिंदे यांचा उत्कृष्ट संस्था चालक म्हणून ऑस्ट्रेलियाच्या शिक्षणमंत्री डेव्हिड प्लॅनेट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ संजयराव तायडे, साई इंग्लिश मिडीयम स्कूलचे आदर्श ढोरजकर, मेस्टा चे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रातील इंग्रजी शाळांचे संस्था चालक, शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजित करण्यात आला होता.
कोरोना काळात व एकंदर संस्था म्हणुन केलेल्या कामाची नोंद संघटनेच्या वतीने घेण्यात आली. त्याच बरोबर संस्थेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण पुरक राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देखील यावेळी घेण्यात आली होती.
प्रा शिंदे यांनी सातत्याने संस्थेच्या माध्यमातून असे उपक्रम राबविलेले असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे नगर दक्षिण चे अध्यक्ष सुनील लोटके व सचिव यश शर्मा यांनी सांगितले.
प्रा.शिंदे हे आय एम एस या व्यवस्थापन संस्थेत मागील २३ वर्षापासून कार्यरत आहेत. तेथील प्रशासकीय व इतर विविध उपक्रमातील कामाच्या अनुभवाचा फायदा शाळेचे व्यवस्थापन पाहताना होत असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
सन २०१६ पासून कोलते इंग्लिश मिडीयम स्कूल च्या माध्यमातून पारगाव या ग्रामीण भागात व परिसरात शिंदे यांनी सातत्याने आरोग्य शिबिर, वृक्ष संवर्धन, उद्योजकता विकास शिबिर, मुद्रा लोन शिबिर, महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी विविध गुण दर्शन स्पर्धा, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, असे अनेक उपक्रम राबविले.
या अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूरदर्शन वरील प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले. या यशाबद्दल आय एम एस संस्थेचे माजी सरसंचालक डॉ शरद कोलते, विद्यमान संचालक डॉ एम बी मेहता, उपसंचालक डॉ विक्रम बार्नाबस व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ मिरा कुलकर्णी, संगणक विभाग प्रमुख डॉ उदय नगरकर, शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.