मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत पॉलिटिकल प्रमोशन – किरण काळे
फकीर निलेश लंके दिल्ली गाजवणारच…
प्रतिनिधी : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या फॉर्म भरण्यासाठीच्या रॅली आणि सभेवर तोफ डागत प्रहार केला आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश लंके दोघांनी उमेदवारी अर्ज भरले. नगरकरांनी दोन्ही पॅटर्न पाहिले. भाजप उमेदवाराच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेला आणि रॅलीत अनेक पोस्टर्स झळकले. मुख्यमंत्र्यांच्या सभेला अनेकांची उपस्थिती होती. तर दुसऱ्या बाजूला निलेश लंके यांनी अत्यंत साधेपणाने अर्ज दाखल केला आहे. अंध, अपंग बांधवांना सोबत घेत अर्ज दाखल केला आहे. फकीर असणाऱ्या निलेश लंके यांचा विजय निश्चित असून ते दिल्ली देखील जनशक्तीच्या पाठबळावर नक्कीच गाजवतील असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे.
किरण काळे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सकाळी ९ ते ५ या वेळेत बाजारपेठेत नो व्हेईकल झोनचा आदेश प्रशासनाने जारी केला. यामुळे व्यापारी, फेरीवाले, हातगाडीवाले, हातावर पोट भरणारे, गोरगरीब, कष्टकरी या सगळ्यांचे व्यावसायिक नुकसान झाले. जनसंवाद यात्रेची सांगता नगर शहरातच शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही केली. मात्र यावेळी आम्ही व्यापाऱ्यांना वेठीस धरले नाही. लंकेंसाठी शहर आणि ग्रामीण भागातून माणसं आपुलकीतून मोठ्या संख्येने स्वयं स्फुर्तीने सभेला आली होती. तर भाजप उमेदवाराला भाडोत्री माणसं गोळा करावी लागली. हा त्यांचा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्या आधीच पराभव झाल्याचे चिन्ह आहे.
किरण काळे पुढे म्हणाले,निलेश लंके हे 24 तास 365 दिवस उपलब्ध असणारे स्व. अनिलभैय्या राठोड यांच्यासारखे भावी मोबाईल खासदार आहेत. मतदारांनी विरोधकांच्या दहशतीला बळी पडू नये. लंके यांना रात्री अपरात्री आपण केव्हाही हाक द्या, काँग्रेसला हाक द्या, तुमच्या मदतीसाठी आम्ही तत्परतेने धावून येऊ, असे आवाहन काळे यांनी नगरकरांना केले आहे.
- Advertisement -