नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार.
दिल्लीगेट येथे वाहनांना फटाका जनता बॅनचे लावले स्टिकर
अहमदनगर प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटानंतर नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी दिवाळी फटाकेमुक्त साजरी होण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने शहरातील दिल्लीगेट वेस समोर फटाका जनता बॅन अभियान राबविण्यात आले. नागरिकांना फटाके न वाजवता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करुन, रस्त्यावरुन येणार्या-जाणार्या वाहनांवर फटाका जनता बॅनचे स्टिकर लाऊन जनजागृती करण्यात आली.

महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करुन फटाका जनता बॅन अभियानाची सुरुवात करण्यात आली. घरा घरात अन देशभरात फटाका वॉरियर्स, फटाका मुक्त व कोरोनामुक्त दिवाळीच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या.
या जनजागृती अभियानात अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, पर्यावरण प्रेमी पै. नाना डोंगरे, रईस शेख, सुधीर भद्रे, अशोक भोसले, दिलीप जाधव, पोपट भोसले, शाहीर कान्हू सुंबे, राक्षी प्रजापती, ज्ञानदेव चांदणे आदी सहभागी झाले होते.
चीन आणि रशियामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोना होऊन गेलेल्या अनेक नागरिकांना श्वसन व थकव्याचा त्रास जाणवत आहे. नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी दिवाळी फटाकेमुक्त साजरी होण्याच्या उद्देशाने फटाका जनता बॅन अभियान जारी करण्यात आले आहे.
फटाक्यांच्या धुरामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती उद्भवून जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या आरोग्यासाठी फटाके वाजवू नयेत, असे आवाहन करण्यात आले.
फटाक्यांच्या प्रदुषणाने कोरोनाची तिसरी लाटेला निमंत्रण देण्यासारखे आहे.घराघरात मुलांसह त्यांच्या पालकांनी मनाचा मोठेपणा दाखवून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांच्या सदृढ आरोग्यासाठी दिवाळी फटाका मुक्त साजरी केली पाहिजे.
देशभरात फटाका वॉरियर्स लढल्याशिवाय प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी होऊ शकणार नाही. यासाठी फटाका वॉरियर्स आपली भूमिका चोखपणे बजावणार आहेत. काही उत्साही लोक फटाके विक्रीसाठी व नफा मिळवण्यासाठी जनतेमध्ये वेगळा प्रचार करीत असल्याचे अॅड. गवळी यांनी सांगितले.