बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
रेशनिंगच्या अन्न-धान्याचा लाभ मिळावा, दर्गाच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी
कोपरगावच्या युवकास मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना रेशनिंगच्या अन्न-धान्याचा लाभ मिळावा, दर्गाच्या जागेत अतिक्रमण करुन धार्मिक भावना दुखावणाऱ्या त्या व्यापारीवर गुन्हे दाखल करुन अतिक्रमण हटवावे व कोपरगाव येथील युवकास मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.6 जून) जिल्हाधिकारी कार्यालया समोर बहुजन समाज पार्टीच्या वतीने उपोषण करण्यात आले.
या उपोषणात बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा सचिव सुभाष साबळे, नगर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, महिला जिल्हा उपाध्यक्षा अंजुम सय्यद, मनिषा जाधव, श्री रामपुर, विधानसभा प्रभारी प्रकाश आहेरे, कोपरगाव विधानसभा प्रभारी माहादेव त्रिभुवन, मेहबूब पठाण, छगनराव पानसरे, राकेश कुमार, शबाना पठाण, जुलेखा पठाण, समीना पठाण, सद्दाम सय्यद, अमीर पठाण, तसलीम शेख, अब्दुल रज्जाक, एकबाल शेख, सादिक शेख, फय्युम शेख, नुरजाहा शेख, यास्मीन शेख, उस्मान शेख, खलील शेख, छबुराव मोरे, सुरज यादव, वेदांत गायकवाड, ऋक्षीकेश वाघमारे आदी सहभागी झाले होते.
शहरात अन्न सुरक्षा योजनेच्या अनेक लाभार्थींना रेशनिंगचे धान्य दिले जात नाही. रेशनिंग दुकानदार सर्वसामान्य नागरिकांशी अरेरावीची भाषा करुन उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वंजार गल्ली येथील तो दुकानदार देखील सर्वसामान्यांची पिळवणुक करत असून, अनेक वर्षापासून लाभार्थींना अन्न-धान्याचा लाभ देत नाही. लाभार्थींना अन्न-धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई व्हावी व अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना अन्न-धान्याचा लाभ मिळण्यासाठी उपोषणकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
बेलदार गल्ली, दालमंडई येथील पीर कालाशहा लोहारशहा दर्गाचा दरवाजा तोडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दर्गाचा दरवाजा तोडून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोपरगाव येथील युवक अमिर मोहमंद पठाण याला मारहाण करणारे सनी गायकवाड, बंटी रमेश भोपे, निलेश दादा पवार, जितू खांडेकर, राहुल जोगदंड (सर्व रा. कोपरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करुन पिडीत कुटुंबाला संरक्षण देण्याचे म्हंटले आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले. प्रशासनाच्या वतीने संबंधीत प्रश्नावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले.