कोरोनाच्या संकटकाळात गरजू घटकांसाठी मोफत आरोग्य शिबीर घेल्याबद्दल गौरव
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीराबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने कर्मयोगी पुरस्काराने गौरविण्यात आले.
रामायणाचार्य ह.भ.प. देवीदास महाराज आडभाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश बिडवे, जिल्हा सचिव सुभाष बागुल, शहर अध्यक्ष श्याम औटी, दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष आर्यन गिरमे, उत्तर जिल्हाध्यक्ष सागर आगळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पवार, देशमुख, शाम विधाते, महिला जिल्हाध्यक्षा मनिषाताई गुरव, कार्याध्यक्षा वनिता बिडवे, शहर जिल्हाध्यक्ष अनुरिता झगडे, सौ. नेटके आदींसह ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रामायणाचार्य ह.भ.प. देवीदास महाराज आडभाई यांनी कोरोनाच्या संकटकाळात माणुसकी जिवंत ठेऊन गोर-गरीब रुग्णांकरिता फिनिक्स फाऊंडेशन देवदूताची भूमिका पार पाडली. मनुष्याच्या सेवेतच ईश्वराची सेवा असल्याचे सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, दीन, दुबळ्यांना संकटकाळात फिनिक्स फाऊंडेशनने आधार देण्याचे काम केले.अनेक दृष्टीहिनांना नवदृष्टी देण्याचे काम शिबीराच्या माध्यमातून करुन वंचितांच्या जीवन प्रकाशमय केले. तर गरजू रुग्णांना आरोग्य शिबीर निशुल्क उपलब्ध करुन दिले.२८ वर्षापासून फिनिक्सच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या गरजू घटकातील नागरिकांसाठी अविरतपणे मोफत शिबीर घेण्याचे कार्य त्यांचे सातत्याने सुरु असून, हे शिबीर गरजू घटकांना आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
माऊली गायकवाड यांनी कोरोना काळात नागरिकांची गरज ओळखून फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून बोरुडे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना नवदृष्टी देण्यासाठी त्यांचा पुढाकार राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत बोरुडे यांचा कर्मयोगी पुरस्काराने गौरव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
जालिंदर बोरुडे यांनी सत्काराला उत्तर देताना आरोग्य सुविधा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या परवडत नाही.फिनिक्स फाऊंडेशन राबवित असलेल्या शिबीराच्या माध्यमातून अनेक गरजूंची सोय होत आहे. ही सेवा अविरतपणे सुरु राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.