जिल्हास्तर कृती दलाची आढावा बैठक संपन्न
अहमदनगर :- पोलीस दलाने बालके शोषणास बळी पडणार नाही याची काळजी घेतानाच बालकामगार अथवा तस्करीसारख्या गंभीर गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच अनाथ बालके ज्या ज्या तालुक्यातील आहेत तेथील पोलिस निरीक्षकांनी अनाथ बालकांच्या घरी गृहभेटी देऊन पुढील जिल्हास्तर कृती दल आढावा बैठकीत बालकनिहाय भेटीचा अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील कृती दलाची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित अधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालय तसेच बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार कोविड प्रादुर्भावाच्याकाळात राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात येऊन बैठकीचे आयोजन करण्यात येते.
बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एन.दहिफळे, महानगरपिालकेच्या आरोग्य विभागाचे डॉ.राजूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ.सचिन सोलाट, जिल्हा आरोग्य अधिकारी, उप-शिक्षण अधिकारी-प्राथमिक विलास साठे, शिक्षण विस्तार अधिकारी-माध्यमिक दिनेश लोळगे, समन्वयक, जिल्हा आर्थिक विकास महामंडळ संजय गर्जे, जिल्हा कार्यक्रम आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी मनोज ससे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, अध्यक्ष,बाल कल्याण समिती हनीफ शेख, सदस्या,बाल कल्याण समिती ॲड.बागेश्री जरंडीकर, सोमनाथ कांबळे, चाईल्ड लाईन प्रतिनिधी महेश सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, पोलीस विभागाने कोरोना महामारीमुळे आई व वडील मृत पावलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सध्यस्थितीतील चोवीस बालकांना शासन निर्णयानुसार सर्वोतोपरी संरक्षण तसेच सदर बालके शोषणास बळी पडणार नाही याची सर्व संबधितांनी काळजी घ्यावी, ही बालके बालकामगार अथवा तस्करी सारख्या गंभीर गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच अनाथ बालके ज्या ज्या तालुक्यातील आहेत त्यानुसार पोलिस निरीक्षक यांनी तालुकानिहाय सदर अनाथ बालकांच्या घरी गृहभेटी देऊन अहवाल पुढील जिल्हास्तर कृती दल आढावा बैठकीत बालकनिहाय भेटीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केली.
सद्यस्थितीत अहमदनगर जिल्हयात कोरोनो महामारीमुळे १ हजार २२३ बालकांची माहिती प्राप्त झालेली असल्याचे तसेच त्यापैकी दोन्ही पालक गमावलेली एकूण चोवीस बालके असून एक पालक गमावलेली एकूण १ हजार १९९ बालकांची माहिती प्राप्त झाली असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हा समन्वयक वैभव देशमुख यांनी दिली.
सचिव, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणातर्फे कोरोना महामारीमुळे आई व वडील मृत पावलेल्या बालकांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याचीही दक्षता घेण्याबाबतच्या अहवाल सादर करण्याबाबात मागील बैठकीत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सदर कामकाजासाठी वकिलांचे एक पॅनल तयार करण्यात आीले असून या पॅनलच्या मदतीने बालकांना न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सचिव,जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांनी दिली. कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या अनाथ बालकांना तात्पुरत्या स्वरूपात पिवळी शिधा पत्रिका वाटप करण्यात आल्याची माहिती जयश्री माळी यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजानेचा लाभ देण्यात यावा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली. कोरोना महामारीमुळे विधवा झालेल्या महिलांचे बचतगट स्थापन करून बचत गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्राधान्याने लाभ देण्याबाबत तसेच या बचत गटांना जिल्हा आर्थिक विकास महामंडळ या विभागामार्फत कमी व्याज दरात भाग भांडवल उपलब्ध करून देण्याचीही सूचना बैठकीत करण्यात आली. बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेशित करण्यात आले.