बीएसएनएल ऍम्प्लाईज युनियन महाराष्ट्र परिमंडळाच्या आठव्या अधिवेशनाचा समारोप

- Advertisement -

६ सप्टेंबर पासून कर्मचारी, अधिकारी जनतेपर्यंत पोहचून बीएसएनएल कंपनीच्या वास्तविकता मांडणार

अधिवेशनात संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी कॉ. नागेश नलावडे तर संघटन सचिवपदी नगरचे रमेश शिंदे यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएल कंपनी तोट्यात गेली. कंपनीमधील एक लाख पेक्षा अधिक कामगारांना वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्ती लादण्यात आली. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शन रिव्हिजन करणे शक्य असूनही, सरकार हा निर्णय घेत नाही. यामुळे सरकारचा कोणत्याही प्रकारे फायदा-तोटा होणार नाही. पण केवळ सरकार सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा अंत पाहत आहे. संघटना व इतर संघटना एकत्रितपणे सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचार्‍यांना पेन्शन व पे रिविजन देण्याची मागणी करीत आहे. याकरिता स्वतंत्र फडांमध्ये तरतूद वेगळी केलेली आहे. त्यामुळे बीएसएनएल मधील कामावर असलेल्या कर्मचार्‍यांची पे रिव्हिजन ताबडतोब करावी, तसेच १८ हजार टॉवर अपडेट केल्यानंतर बीएसएनएल पूर्वपदावर कार्यरत राहून ग्रामीण भागात व शहरी भागात अत्यंत उत्तम सेवा देणार असल्याची खात्री कॉ. पी. अभिमन्यू यांनी दिली. तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना १ जानेवारी २०१७ पासून नवीन वेतन करार देणे शक्य असल्याचे स्पष्ट केले.

केडगाव येथील निशा लॉनमध्ये बीएसएनएल ऍम्प्लाईज युनियनच्या महाराष्ट्र परिमंडळाचे आठव्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी कॉ. अभिमन्यू  बोलत होते. यावेळी कॉ. नागेशकुमार नलवडे, कॉ. आप्पासाहेब गागरे, कॉ. जॉन वर्गीस, कॉ. गणेश हिंगे, कॉ. विठ्ठलराव औटी उपस्थित होते.

पुढे बोलताना कॉ. अभिमन्यू म्हणाले की, बीएसएनएल व इतर सार्वजनिक उद्योग हे जनतेच्या हिताचे व माफक दरात सेवा देत आहेत. आज बँक, रेल्वे, पोस्ट ऑफिस, टेलीकॉम, एलआयसी, पेट्रोल, गॅस यामध्ये पब्लिक सेक्टर कार्यरत असल्यामुळे जनतेची लूट होत नाही. बीएसएनएल फोर जी स्पेक्टरम, आवश्यक अश्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यास व साधन सामग्री खरेदी करण्यास परवानगी दिल्यास बीएसएनएल ही कंपनी पुन्हा फायद्यात येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. हजारो कोटी कर रूपाने पैसा या कंपनीकडून सरकारला मिळत आहे. केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या कंपनीला गेली काही दिवस तोटा सहन करावा लागला. पण गेल्या दोन वर्षांमध्ये फोरजी सुविधा नसतानासुद्धा कंपनीकडे दोन कोटी पेक्षा अधिक ग्राहकांनी बीएसएनएलची सेवा घेणे पसंत केले आहे. बीएसएनएल मधील लँडलाईन व इंटरनेट सारखी सुविधा इतर कंपन्यांना देता आली नाही. अगोदर इंटरनेट व फोनची सुविधा फ्री देणार्‍या कंपन्यांनी लोकांची फसवणूक करुन लुटायचे काम सुरु केले असल्याचा आरोप त्यांनी केला. बीएसएनएल कंपनीला सरकारने बळ दिल्यास नजीकच्या काळात किमान एक लाख इंजिनियर पदवीधर कामगारांना रोजगार उपलब्ध होईल व देशातील बेकारी कमी करण्यामध्ये हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्यात जात पडताळणीच्या नावाखाली बीएसएनएल मध्ये एसटी या राखीव लोकांना स्क्रुटीनी कमिटी  पाठवण्यासाठी त्रास दिला जात आहे. हा मराठी माणसाचा अपमान आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने ४० वर्ष सेवा केलेल्या कर्मचार्‍यांना त्रास देणे थांबवावे हा प्रमुख मुद्दा पार्लमेंटरी कमिटी पर्यंत मांडण्याचे आश्‍वासन कॉ. अभिमन्यू यांनी दिले.

दि.६ सप्टेंबर पासून सर्व देशभर बीएसएनएल मधील कर्मचारी, अधिकारी हे जनतेपर्यंत पोहचून कंपनीच्या वास्तविकता मांडणार आहे. कंपनी सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती जनतेला अवगत करुन दिला जाणार आहे. बीएसएनएलला फोर जी स्पेक्ट्रम व आवश्यक साधन सामुग्री ताबडतोब उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तर खाजगीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी एकत्रपणे लढा देण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. अमिता नाईक यांनी केले. मावळते अध्यक्ष कॉ. आप्पासाहेब गागरे पाटील यांनी आभार मानले. कोरोना नियमांचे पालन करुन सदरचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, गोवा, मराठवाडा विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. विजय शिपणकर, कॉ. संतोष  शिंदे, कॉ. वजीर शेख, कॉ. चंद्रकांत जाधव, कॉ. शंकर चेडे, कॉ. शिला झेंडे, कॉ. संपत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
—————————–
बीएसएनएल ऍम्प्लाईज युनियनच्या महाराष्ट्र परिमंडळाच्या आठव्या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कॉ. नागेश नलावडे यांची अध्यक्ष, कॉ. गणेश हिंगे यांची सचिव तर कॉ. विठ्ठल औटी यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच अहमदनगर येथील कॉ. रमेश शिंदे यांची संघटन सचिवपदी निवड झाली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles