बोगस पदवी प्रमाणपत्राद्वारे पदोन्नती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल व्हावे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी
प्रयाग अलाहाबादचे बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयाग अलाहाबाद संस्थेकडून हिंदी विषयात विशारद म्हणून बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन पदोन्नती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख व ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
प्रयाग अलाहाबाद संस्थेने 2005 नंतर हिंदी विषयात विशारद पदवी देण्यास स्थगिती दिली आहे. 2005 नंतर अशा मिळवलेल्या पदव्या बोगस असल्याचा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. खोट्या पदव्या घेऊन शिक्षक बढत्या घेत आहेत. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी गप्प असून, त्यांच्याच आशीर्वादाने हे काम होत आहे. शिक्षण विभागात ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्रप्रमुख प्रमोशन प्रक्रियेमध्ये जवळजवळ आठ ते दहा मुख्याध्यापकांनी बीएड समकक्ष अलहाबाद विद्यापिठाचे बीएड प्रमाणपत्र जोडून लाभ घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विचारणा केली असता, खोट्या प्रमाणपत्रधारकांनी तात्काळ नकार देऊन माघार घेतली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
हा गंभीर प्रकार असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन त्या आधारे पदोन्नती घेण्याचा प्रयत्न करणारे व नकार देऊन माघार घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे व याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने करण्यात आली आहे