देश आधुनिक व शक्तिशाली बनविण्यासाठी भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांनी जीवन समर्पित केले – अॅड. सतिशचंद्र सुद्रिक
अहमदनगर (प्रतिनिधी)- देश आधुनिक व शक्तिशाली बनविण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देशाला जीवन समर्पित केले. स्वकर्तृत्वावर त्यांनी सर्व यश मिळवले. शिक्षण व वाचनाच्या सामर्थ्यावर त्यांनी ज्ञान आत्मसात केले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेऊन वाचनाने व शिक्षणाने आपले जीवन घडविण्याचे आवाहन ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सतिशचंद्र सुद्रिक यांनी केले.
देशाचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणादिनानिमित्त गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या नुतनीकृत वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अॅड. सुद्रिक बोलत होते.
व्हीआरडीईचे माजी अधिकारी प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्दम, विद्यालयाचे प्राचार्य दिपक रामदिन, श्रमिक नगर शाखेच्या मुख्याध्यापिका विद्याताई दगडे, ग्रंथपाल विष्णू रंगा, प्रा. अनिल आचार्य, पर्यवेक्षिका सरोजनी रच्चा, विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरेश मैड आदी उपस्थित होते.
पुढे अॅड. सुद्रिक म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन डॉ. अब्दुल कलाम यांनी यशोशीखर गाठले. विद्यार्थ्यांनी देखील परिस्थितीवर मात करुन संधीचे सोने करणे शिकले पाहिजे. देश सक्षम व शक्तीशाली करण्यासाठी त्यांनी अणुबॉम्बची निर्मिती केली.
शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी देशासाठी काम केले. जीवनात जो शिकेल तो टिकेल, असल्याचा संदेश देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्याचे व शरीर सदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. तसेच वाचनालयासाठी पाच हजार रुपये मदतीची घोषणा केली.
देशाचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत सादर केले. प्रास्ताविकात प्राचार्य दिपक रामदिन यांनी शाळेत सुसज्ज असे वाचनालयाचे नूतणीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी दर शनिवारी शाळेत कथामाला वाचनाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
ग्रंथपाल विष्णु रंगा यांनी मार्कंडेय शाळेतील वाचनालय अद्यावत करण्यासाठी ई लायब्ररी सुरु करण्याचा मानस व्यक्त केला. विद्यार्थ्यांसह दीड वर्षानंतर हा कार्यक्रम शाळेत रंगला असल्याचे स्पष्ट केले.
प्रा. बाळकृष्ण सिद्दम यांनी वाचनाने मन शुद्ध व जीवन समृद्ध होते. तर ज्ञानाची श्रीमंती वाढते. एक पुस्तक मनुष्याच्या जीवनाला दिशा देऊ शकते. वाचनाने जीवन घडत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश मैड यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने जीवनाला दिशा मिळल्याचे सांगितले.
प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर यांनी विद्यार्थीरुपी मातीच्या गोळ्याला शिक्षक आकार देतात. पुस्तके जीवनात दिशा देतात. ग्रंथ हे जीवनाचा कणा असून, विचार समृध्द करण्याचे साधन असल्याचे सांगून त्यांनी वाचनाचे महत्व विशद केले. तर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सहवासात आलेले प्रेरणादायी अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चन्ना यांनी केले. आभार अर्चना साळुंके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुका खरदास, आशा दोमल, सेवक निलेश आनंदास, मथुरा आढाव, अजय न्यालपेल्ली, सुहास बोडखे आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.