शाळेच्या पाचंगे यांचा गौरवपुर्ण सत्कार
सर्वगुण संपन्न शिक्षक शाळेला मिळाल्याने गुणवत्तेचा आलेख वाढला – संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील अ.ए.सो. च्या नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा अनिल पाचंगे सेवानिवृत्त झाले असता,शाळेत आयोजित सेवापुर्ती कार्यक्रमात त्यांचा गौरवपुर्ण सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते संजय सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शाळा समिती सदस्य अॅड. गौरव मिरीकर, बापूसाहेब शिंदे, रविंद्र बाकलीवाल, भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, रुपीबाई बोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक पडोले सर, बाई इचरजबाई प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कदम, अशोकभाई फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड, भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र बेद्रे आदींसह सर्व आजी-माजी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागत गीताने झाली. प्रास्ताविकात दिपक कराळे यांनी मुख्याध्यापिका सुरेखा पाचंगे यांनी शाळेत ३९ वर्ष सेवा देत असताना विद्यार्थी घडविण्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुरेखा पाचंगे यांना गौरविण्यात आले.
संजय सपकाळ म्हणाले की, सर्वगुण संपन्न शिक्षक शाळेला मिळाल्याने गुणवत्तेचा आलेख वाढला.तर भिंगार मधील सर्वसामान्यांची मुले शिकून उच्चपदावर गेली.अ.ए.सो.च्या नवीन मराठी शाळेने सर्वसामान्य कामगारांची मुले घडवली.
यामध्ये शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट करुन पाचंगे यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे त्यांनी कौतुक केले.उपस्थित पाहुण्यांनी मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पाचंगे यांनी नेहमीच पुढाकार घेतला असल्याचे स्पष्ट करुन,त्यांच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना सुरेखा पाचंगे म्हणाल्या की, शाळा हे मंदिर समजून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळताना सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेच्या संचालकांचे सहकार्य लाभले.सर्वांनी साथ दिल्याने मोठी जबाबदारी पुर्ण करु शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अ.ए.सो. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व शाळा समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर यांनी पाचंगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन मराठी शाळा विश्रामबागचे गणेश बुरा यांनी केले.आभार शरद कातोरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.