भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर
नवी मुंबई : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने कामोठे नगरी दुमदुमली होती. सर्वत्र सुजय विखे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. मोठ्या थाटामाटात कामोठे पुलापासून ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पारनेरकर सहभागी झाले होते.
सदर सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुजय विखे पाटील यांच्या स्वरूपाने लोकसभेचा निकाल लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीम मध्ये पारनेरकर आणि अहिल्यानगर मधील जनतेच्या वतीने सुजय विखे पाटील येणाऱ्या काळात नेतृत्व करतील, असा विश्वास व्यक्त केला.
तर विजय औटी यांनी व्हिजन असलेला नेता जनतेला मिळणार असून, विखे पाटील कुटुंबीयांनी मागील 50 वर्षांपासून जनतेची सेवा केली असून डॉ. सुजय विखे पाटील, ही परंपरा अखंड चालवत आहेत. यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी असून त्यांच्या चौथ्या पिढीला सत्तेत बसविले आहे.
विरोधकांवर ताशरे ओढताना औटी यांनी सुपा एमआयडीसी च्या मध्ये स्थानिकांना डावलून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम पारनेर मधील लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या दहशतिला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरंग लागणार असून, त्यांच्या व्हिजनमुळे येणाऱ्या काळात स्थलांतरणाला आळा बसणार असून स्थानिक तरुणांना आपल्या परिसरात काम मिळेल, मागील पाच वर्षांच्या त्यांच्या विकास कामामुळे जनतेचा नेता म्हणून डॉ. सुजय विखे पाटील लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी पारनेरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत सदरची निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आहे. यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे. विखे परिवार सदैव पारनेरकरांच्या पाठीशी आहे. मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार असून येणाऱ्या काळात फक्त विकासाचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पारनेर,अहिल्यानगर, आणि नवी मुंबईतील सर्व भाजप आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.