मतं विकत घेणाऱ्यांच्या विरोधात सत्तापेंढारी शपथभंग चळवळ जारी
मतदाराला विकत घेऊन देशाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या विरुध्द डिच्चू कावा करण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीत मतं विकत घेणाऱ्या सत्ता पेढाऱ्यांना डिच्चू कावा देण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून सत्तापेंढारी शपथभंग चळवळ जारी करण्यात आली असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. मतदारांना विकत घेऊन देशाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या विरुध्द डिच्चू कावा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजांची जागा सत्ता पेंढाऱ्यांनी घेतली. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेला चटावलेल्या सत्ता पेंढाऱ्यांनी सर्रास पैसे वाटून किंवा कोंबडी, बाटलीचा वापर करून मागच्या दाराने मतं मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भारतात मतकोंबाड आणि ढब्बू मकात्या म्हणजे मला काय त्याचे? म्हणणारा समाज फार मोठा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात दारिद्य्र न संपण्याचे कारण म्हणजे सत्तापेढाऱ्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारून सगळा माल घरी नेला. त्यामुळे सगळीकडे बेकारी, दारिद्य्र, झोपडपट्ट्या, उखडलेले रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सर्व बाबी प्रत्येक नागरिकाला भोगाव्या लागत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांसाठी हा देश नरक यातना देणारा ठरत आहे. काही कुटुंबातील पाच पिढ्या नवरा बायको मुलं सर्व सत्तेवर राहतात. याचा दोष प्रत्येक भारतीय मतदारांवर आहे. त्यामुळे हजार, पाचशे रुपये देऊन मतं विकत घेणाऱ्या सत्ता पेंढाऱ्यांना डिच्चू कावा देण्याचा निश्चय करण्यात आला असल्याचे म्हंटले आहे.
येत्या निवडणुकीत डिच्चू काव्याची प्रचिती सर्वांना आल्याशिवाय राहणार नाही. लोकांबद्दल भक्ती नाही, लोकांच्या प्रश्नांची जाणीव नाही, लोकांसाठी कवडीचे कामे नाही! अशा सत्तापेंढाऱ्यांना मतपेटीतून कायमचा निरोप देण्यासाठी ही शपथभंगाची चळवळ संघटनेने चालवली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सत्तापेंढारी लोककर्कासूर सुरू झाले आहेत . त्यामुळे त्यांना घरी पाठवणे हाच मार्ग शिल्लक राहिला आहे. मुलाबाळांची हातावर जोंधळा देऊन शपथ देणाऱ्या सत्तापेंढाऱ्यांना जय शिवाजी, जय डिच्चू कावा या मंत्राने कायमचा निरोप देऊन घरी पाठवण्याचा राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.शपथभंग चळवळ यशस्वी करण्यासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरुडे आदी प्रयत्नशील आहेत.