मतदानासाठी दिव्यांगही पडले घराबाहेर
मतदानातून दिसला दिव्यांगांचा उत्साह
अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदानाचा टक्का वाढून, लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिव्यांगांनी घराबाहेर पडून मतदान केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा चौथ्या टप्प्यात नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदान प्रक्रिया सोमवारी (दि.13 मे) पार पडली. यामध्ये दिव्यांगांचा उत्साह दिसून आला.
शहराच्या बुरुडगाव रोड, भोसले आखाडा येथील मतदान केंद्रावर दिव्यांग विनायक केशव ढाकणे, मनीषा केशव ढाकणे, स्नेहल कांतीलाल पुरोहित, शादाब समीर शेख या कर्णबधिर, अस्थिव्यंग व मतिमंद दिव्यांग व्यक्तींनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. या दिव्यांग मतदारांचा जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जिल्हा परिषद) देविदास कोकाटे, विशेष समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, दिव्यांग संघटनेचे ॲड. लक्ष्मणराव पोकळे यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. यावेळी नोडल अधिकारी बाबासाहेब झावरे, सुशिला गायकवाड, विजय बळीद आदी उपस्थित होते. सहाय्यक नोडल अधिकारी शिवानंद भांगरे व सुदाम चौधरी यांनी शहरातील दिव्यांगांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी मतदारांच्या भेटी घेऊन दिव्यांगानां मतदान करण्याचे आवाहन केले.