मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार
राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म या तिन्हींचा त्रिवेणी संगम
डिच्चू कावा तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म या तिन्हींचा त्रिवेणी संगम साधत मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीने पुढाकार घेतला आहे. तर चांगले उमेदवार निवडून देऊन सत्तापेंढारी यांना घरचा रास्ता दाखविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा डिच्चू कावा तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन या चळवळीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
भारतातील लोकशाहीचे मूळ आठव्या शतकात दक्षिण भारतात सुरू झालेला भक्ती मार्ग चळवळीतून देशभर भक्ती क्रांती झाली. परंतु या भक्ती मार्गात सर्वश्रेष्ठ परमात्म्याची भक्ती यावर जोर होता. महात्मा गांधीजींनी भक्ती मार्गाचे रूपांतर लोकभक्ती मार्गात केले. सजीवांच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ परमात्म्याचे चैतन्य पसरलेले आहे आणि सजीवांची भक्ती हाच भक्ती मार्गाचा श्रेष्ठ मार्ग आहे. म्हणून गांधीजींनी सर्वोदय आणि अंतोदय चळवळी सुरू केल्या. हिंदू आणि जैन धर्मियांनी अहिंसा आणि सत्य याला महत्त्व दिले. त्याचा गांधीजींनी पूर्णपणे स्वीकार केला. महात्मा गांधीजींनी 5 हजार वर्षापासून सुरू असलेल्या देशातील भक्ती, ज्ञान आणि कर्म यावर आधारित लोकभक्तीवर सत्याग्रही चळवळ सुरू केली आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी निस्वार्थ भावनेने देशाच्या जनतेची सेवा केली. गांधीजींच्या लोकभक्ती मार्गाचा पूर्णपणे अवलंब करून, लोकभज्ञाक चळवळ नव्याने सुरू झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकांची भक्ती, त्यांचे प्रश्न, प्रश्न सोडवण्याचे ज्ञान आणि निष्काम सेवा याचा स्वीकार या लोकभज्ञाक चळवळीने केला आहे. त्याचा भाग म्हणून वन्य प्राण्यांसाठी भीम हनुमान बंधारे बांधणे, धनराई योजना राबविणे इत्यादी कामांना चळवळीने प्राधान्य दिले आहे. लोकभज्ञाक चळवळ ही राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म या तिन्हींचा त्रिवेणी संगम आहे. जगातील इतर देशांमध्ये असणाऱ्या लोकशाहीपेक्षा लोकभज्ञाकशाही ही सर्वश्रेष्ठ शासन प्रणाली आहे. त्यामुळे या चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या आणि सर्व सजीवांचे कल्याण नक्कीच होऊ शकणार असल्याची भावना ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.
सध्या सत्ता-संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी सत्तापेंढारी प्रयत्नशील आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतकोंबाड आणि ढब्बुमकात्या या दोन प्रवृत्तीच्या लोकांनी उच्छाद सुरू केला आहे. मतकोंबाड म्हणजे कोंबडी आणि पैशाच्या बदल्यात मुलांची व माणसांची शपथ घेऊन मत देणारे समाजभ्रष्ट लोक आणि मला काय त्याचे असे म्हणणारे आणि मतदानापासून दूर राहणारे ढब्बुमकात्या प्रवृत्तीचे लोक लोकभज्ञाक चळवळीमुळे बदलल्याशिवाय राहणार नसल्याचेही ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
संपूर्ण देशात जय शिवाजी जय डिच्चूकावा या महामंत्राचा वापर लोकभज्ञाक चळवळीने सुरू केला आहे. जे सत्तापेंढारी आपल्याला पैशाच्या बदल्यात विकत घेऊ पाहत आहेत; ते देशाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याशिवाय राहणार नाही. याची जाणीव प्रत्येक मतदारांनी ठेवली पाहिजे. मतदानाच्या वेळी अशा सत्तापेंढारी यांना मत न देता सार्वजनिक जीवनातून संपवणे आणि चांगल्या माणसाला निवडून आणणे याशिवाय मतदारांसमोर काही एक पर्याय नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.