मतदार जागृतीवर झालेल्या निबंध स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वृषाली हिवाळे व अरिफा शेख प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शालेय गटात वृषाली हिवाळे व खुल्या गटात अरिफा शेख यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींनी माझे मत माझे भविष्य, एका मताची शक्ती, मतदान राष्ट्रीय कर्तव्य, मी नव्या युगाचा मतदार, सशक्त लोकशाहीतील निवडणुक व मतदान प्रक्रिया या विषयावर आपल्या भावना निबंधातून मांडल्या.
लोकशाही सुदृढ होण्यासाठी युवकांसह प्रत्येक नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने संस्थेच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरु आहे. युवकांमध्ये मतदार जागृती करण्याच्या उद्देशाने व मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
शालेय विद्यार्थी गट प्रथम- वृषाली हिवाळे (महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव), द्वितीय- वसुंधरा पवार (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल), तृतीय- भूमिका हिवाळे (महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव), खुला गट प्रथम- अरिफा मीराबक्ष शेख (वडाळा महादेव, श्रीरामपूर), द्वितीय- अश्विन गुप्ता (नगर शहर).