कर्मचारी कल्याण निधीच्या माध्यमातून आधार देण्याचे काम – महापौर रोहिणी शेंडगे
अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावाचे मोठे संकट जगभरात आले होते.या काळात आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न निर्माण झाला,त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावरही परिणाम झाला.अशाही परिस्थितीत शासनाच्या निर्देशाने महानगरपालिकेचे कर्मचार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना सेवा उपलब्ध करुन दिली.कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून नगरकरांना आरोग्य सेवा देऊन दिलासा देण्याचे काम केले.
मनपा कर्मचारी व सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आज कोरोना आटोक्यात येत आहे.परंतु या दरम्यान आपण अनेक जवळच्या व्यक्तींना गमावून बसलो आहे.मनपाचे कर्मचारीही यात मृत्यू पावले,हे कोरोना योद्धे होते.या कर्मचार्यांच्या पाठिशी मनपा नेहमीच राहिली आहे.
कर्मचार्यांच्या आरोग्याबरोबरच व त्यांच्या पश्चात कुटूंबियांना मदतरुपी आधार देण्याचे काम मनपा कर्मचारी कल्याण निधीच्या माध्यमातून होत आहे,असे प्रतिपादन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी केले.
अहमदनगर मनपा कर्मचारी कल्याण निधी अंतर्गत मनपातील कोविडने मयत झालेल्या वारसास रु.१ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक संजय शेंडगे,संजय चोपडा, अनंत लोखंडे,सुनिल क्षेत्रे,शेखर देशपांडे,राजेश लयचेट्टी,किशोर कानडे,मंगेश शिंदे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, कोरोना काळात मनपा कर्मचार्यांनी शहरातील नागरिकांना चांगली सेवा पुरवून शहरवासियांना दिलासा दिला.कोरोना झालेल्या व्यक्तीच्या जवळ नातेवाईक येत नसतांना मनपाचे डॉक्टर,आरोग्य सेवक, कर्मचारी कामकरत होते आणि आजही करत आहेत.परंतु या दरम्यान मृत्यू पावलेल्या कर्मचार्यांच्या कुटूंबियांच्या पाठिशी मनपा परिवार आहे.याच भावनेतून आज मदतरुपी दिलासा देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अनंत लोखंडे यांनी मनपा कर्मचारी कल्याण निधीची माहिती देऊन दिवंगत कर्मचार्यां प्रती आपल्या भावना व्यक्त करुन संघटना या कर्मचार्यांच्या कुटूंबियांच्या पाठिशी उभी राहिल,अशी ग्वाही दिली.शेवटी शेखर देशपांडे यांनी आभार मानले.