मनपा महिला व बालकल्याण समितीला जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा…
अहमदनगर प्रतिनिधी : नगर महानगरपालिकेत महिला व बालकल्याण समितीवर एक महिन्याआधी नूतन पदाधिकारी निवडण्यात आले आहेत.सभापती व उपसभापतींनी पदभार घेतला असला तरी सध्या महिला व बालकल्याण समितीकडे निधीच शिल्लक नसल्याने पदाधिकाऱ्यांना नागरिकांसाठी कामे करताना अडचण येत आहे.
या समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ निधी अभावी नागरिकांना मिळत नाही.ही बाब लक्षात घेवून जिल्हा नियोजन समितीमार्फत मनपाच्या महिला व बालकल्याण समितीला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपसभापती मीनाताई चोपडा व माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.यावेळी आ.संग्राम जगताप,उपमहापौर गणेश भोसले उपस्थित होते.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी लगेचच निवेदनावर टिप्पणी करीत निधी देण्याबाबत अधिकार्यांना सूचित केले. राज्य सरकार महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी कटिबध्द आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठी कायम आग्रही असतात.त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालकल्याण समितीला निधी देण्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी लगेचच मान्य केल्याचे संजय चोपडा यांनी सांगितले.
याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगर मनपात एक महिन्यापूर्वी महिला व बालकल्याण समितीची पुन:स्थापना करण्यात आली. परंतु,या समितीकडे एकही पैसा शिल्लक नाही.त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत.येणाऱ्या नागरिकांना व संघटनांना काम न होताच परत जावे लागते.
आ.संग्राम जगताप यांच्या सहकार्याने उपसभापतीपद मिळाले आहे.या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अधिक चांगले काम करून दाखविण्याचा प्रयत्न आहे.परंतु समितीकडे काहीच निधी शिल्लक नसल्याने अनेक प्रस्ताव अडकून पडले आहेत.या पार्श्वभूमीवर या समितीमार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.