शेवगाव ते वरूर रस्त्याची दुरवस्था
अमरापूर प्रतिनिधी-शेवगाव तालुक्यातील शेवगाव ते वरुर रोडवर असणारे खड्डे तात्काळ दुरुस्त करावे अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने उपअभियंता शेवगाव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असे मराठा सेवा संघ शेवगाव व समस्त वरुर ग्रामस्थांकडून मा.उपअभियंता, सा.बा विभाग शेवगाव यांना देण्यात आले.
वरुर गावामध्ये स्वयंभू विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर असल्यामुळे या नगरीस धाकटी पांढरी म्हणून या गावाची शेवगाव तालुक्यात ओळख आहे.आषाढी-कार्तिकी एकादशीला हजारो भाविक दर्शनासाठी ठिक ठिकाणावरून येत असतात.या गावातून वरुर,सुसरे, पिंपळगाव,पाथर्डी,मोहटादेवी या ठिकाणी जाण्या-येण्याची देखील वर्दळ असते.
कार्तिकी एकादशी जवळ आल्यामुळे शेवगाव ते वरुर पर्यंत खराब रस्ता,खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा.या रस्त्याने प्रवास करताना रस्त्यात खड्डा आहे कि खड्यात रस्ता हेच लक्षात येत नाही.यामुळे अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे.भविष्यात या खड्यामुळे मोठी जीवीतहानी होऊ शकते.त्यामुळे येत्या आठ दिवसात शेवगाव ते वरुर रस्त्यावरील खड्डे डांबरानी दुरुस्त करावेत.अन्यथा कुठलीही कल्पना न देता आम्ही सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ आपल्या या कार्यालयात टाळ-मृदूंगच्या गजरात ठिय्या आंदोलन करणार आहोत.अशा आशयाचे निवेदन दिले.
या निवेदनावर सहसचिव शिवश्री सचिन म्हस्के मराठा सेवा संघ,युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब पाचारणे चर्मकार संघर्ष समिती शेवगाव,ज्ञानेश्वर वावरे,रामेश्वर म्हस्के,नितीन उभेदळ,सागर गोसावी,नंदकिशोर कर्डीले,ज्ञानेश्वर म्हस्के,महेश म्हस्के,राधाकिसन गारपगारे,संदीप झिरपे,प्रमोद डांगरे,दीपक म्हस्के,चंद्रकांत भुजबळ,विकी खैरे इ. ग्रामस्थांच्या सह्या आहेत.