अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धा व तंत्रज्ञानाच्या युगात मार्केट ग्लोबल झाले असून, सर्वसामान्य व ग्रामीण भागातील युवकांनी शेअर मार्केटचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व नागरिकांना पैश्याचे व आरोग्याचे महत्त्व कळाले आहे. युवकांनी एका व्यवसायावर विसंबून न राहता इतर व्यवसायाबरोबरच शेअर मार्केटमध्ये योग्य प्रकारे गुंतवणक केल्यास चांगल्या प्रकारे पैसे मिळवता येऊ शकते. अनेक व्यक्तीमत्व शेअर मार्केटच्या माध्यमातून आर्थिक संपन्न झाले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सर्वसामान्य कुटुंबासह ग्रामीण भागातील युवक-युवतींना मराठी भाषेतून शेअर मार्केटचे ज्ञान मिळण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर-मनमाड रोड सावेडी येथे सुरु करण्यात आलेल्या इनव्हिजन शेअर मार्केट अॅकॅडमीच्या शुभारंभाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन अॅकॅडमीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जय गायकवाड, संचालक कुणाल जगताप, चंद्रकांत जगताप, प्रविण जगताप, सागर चिंधाडे, दिनेश देवरे, देवराम तुपे, मच्छिंद्र गोरे, मयुर दुर्गे, राहुल डोंगरे, आशा गायकवाड, प्रविण जगताप, संदीप डोळस आदी उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, कोरोनानंतर अनेक व्यवसाय डबघाईस आले. तर अनेकांचा रोजगार बुडून नोकर्या गेल्या. बँकाचे व्याजदर देखील कमी असल्याने आपला पैसा गुंतवणुक म्हणून शेअर मार्केटचा अभ्यास करुन त्यामध्ये गुंतवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अॅकॅडमीचे संचालक कुणाल जगताप यांनी गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट सर्वोत्तम पर्याय असून, याकडे मराठी बांधव लक्ष देत नाही. पैसे साचवण्यापेक्षा पैश्यातील काही हिस्सा शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यास भविष्यात त्याचा परतावा चांगला मिळू शकतो. कोरोनानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. शेअर मार्केटबद्दल सखोल ज्ञान नसल्याने गुंतवणुकदारांना नुकसान भोगावे लागतात. परंतू त्याचा योग्य अभ्यास करुन गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अॅकॅडमीच्या माध्यमातून शेअर मार्केटबद्दल बेसिक ते अॅडव्हान्स कोर्स घेतले जाणार आहेत. सेन्सेक्स, निफ्टी, मनी व रिस्क मॅनेजमेंट, चार्ट कसा पहावा? आदी शेअर मार्केटची सखोल माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. नवीन लोकांनी शेअर मार्केटमधून झटपट पैसे कमवण्याआधी ते ज्ञान आत्मसात करण्याकडे लक्ष दिल्यास यशस्वी होता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय खामकर यांनी पैसा साठवण्यापेक्षा गुंतवणुक केल्याने वाढतो. यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक हा पर्याय देखील उत्तम असून, यासाठी त्याचे ज्ञान आत्मसात करण्याचे सांगितले. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी अॅकॅडमीच्या माध्यमातून शेअर मार्केटमधील बारकावे शिकता येणार असल्याचे सांगून, अॅकॅडमीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.