कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
प्रांत अधिकारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणणारे कलम ३५३ हे आज वाढवण्यात आले,यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन काल दुसऱ्या दिवशी सायंकाळी स्थगित केले आहे.
मात्र हल्ला करणारा पोलिस कर्मचारी केशव व्हरकटे यास २८ नोव्हेंबर पर्यंत अटक करावी अन्यथा संपूर्ण जिल्हाभर कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन केले जाईल,असा इशारा संघटनेने आंदोलन मागे घेताना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये दिला आहे.
कर्जत येथील प्रांताधिकारी अजित थोरबोले हे अवैद्य वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडत असताना त्यांना पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यांनी धक्काबुक्की केली आणि ट्रक ड्रायव्हरला गाडी पळून नेण्यास सांगितले होते.
या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद महसूल विभागामध्ये उमटले आणि काल सोमवारपासून कर्जत तालुक्यातील तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना व कोतवाल संघटना, यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते.
आज मंगळवार दुसऱ्या दिवशी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याच्यावर संघटनांच्या मागणीनुसार शासकीय काम कामात अडथळा आणला म्हणून भादवि कलम ३५३ हे कलम वाढवले आहे आणि तसे लेखी पत्र महसूल कर्मचाऱ्यांना दिले.
या पत्राने आंदोलकांचे समाधान झाले व त्यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपले आंदोलन स्थगित केले आहे व तसे पत्र जिल्हाधिकारी व तहसीलदार कर्जत यांना दिले आहे.