महात्मा गांधीजी जयंती दिनी शहरातील खड्डेमय रस्त्याप्रश्‍नी सत्याग्रह

0
119

खड्डयात फुले वाहून संबळाच्या निनादात ढब्बू मकात्यांचा सत्यांजलीने निषेध

महिलांना सन्मानासह समान दर्जा व हक्क मिळण्यासाठी वन नेशन,वन रिझर्वेशन ५०-५० ची घोषणा

अहमदनगर प्रतिनिधी – भ्रष्टाचार, अनागोंदी व शासन प्रशासनातील टोलवाटोलवीमुळे शहराचे रस्ते खड्डयात गेले असताना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्यासमोरील वाडिया पार्कच्या खड्डेमय रस्त्यावर फुले वाहून संबळाच्या निनादात सत्याग्रह करण्यात आला.या आंदोलनात ढब्बू मकात्यांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करुन महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

वाडियापार्क येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करुन या सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली. तर समाजात महिलांना सन्मानासह समान दर्जा व हक्क मिळण्यासाठी वन नेशन, वन रिझर्वेशन पन्नास-पन्नासची घोषणा करण्यात आली.

या सत्याग्रहात अ‍ॅड. कारभारी गवळी, वीरबहादूर प्रजापती, कारभारी वाजे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, नंदाबाई साबळे, सुखदेव चौरे, किशोर शेरकर, अच्युत खरसाडे, देवीदास पवार, ज्ञानदेव चांदणे, पोपट भोसले आदी सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातसुद्धा देशात अनागोंदी, भ्रष्टाचार आणि शासन प्रशासनातील टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने या देशात स्वराज्य आणि कायद्याचे राज्य उभे राहू शकले नाहीत. या परिस्थिमुळे शहरात प्रत्येक रस्त्यावर  खड्डेच खड्डे दिसतात.

शहरातील रस्ते भ्रष्ट कारभाराचा मोठा नमुना आहे. तर शेकडो वर्षे भारतीय समाजात स्त्रियांना दुय्यम दर्जा देण्यात आला. शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय सर्व क्षेत्रात महिलांना दुय्यम दर्जा देऊन वंचित ठेवण्यात आले. देशातील मनु तालिबानीमुळे महिलांचे हक्क हिरावले गेले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.

आंदोलकांनी खड्डयात ढब्बू मकात्यांचे आत्मे सोडून खड्ड्यात फुले टाकून सत्यांजली वाहिली. ढब्बू म्हणजे निकामी आणि तटस्थ नागरिक. जे होईल ते होऊ दे, मला काय त्याचे? म्हणजे मकात्या. ही ढब्बू मकात्यांची जमात पोसली गेल्याने सर्वच क्षेत्रात अनागोंदी माजली गेली. लोकशाही प्रजासत्ताक राज्याचा प्रमुख घटक असलेल्या नागरिकांनी शासन प्रशासनावर वचक ठेवण्याची जबाबदारी नाकारली. मतकोंबाड म्हणून पैसा, कोंबडी आणि दारूसाठी मत विक्री केलेल्यांना सत्यांजली वाहण्यात आली.

मोठ्या कष्टाने मिळविलेल्या स्वातंत्र्याबद्दल अनास्था दाखविणणर्‍यांचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. तालिबान, पाकिस्तान, चीन हे देश उन्नतचेतना गमावलेले कृष्णविवरे ठरली आहेत. भारतात सुद्धा मनु तालिबानी याच पद्धतीने वागत असून, मानवी मूल्ये पायदळी तुडवत महिलांना दुय्यम दर्जा देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महिलांना अनेक वर्षे दुय्यम दर्जा दिला गेल्याने राष्ट्राला अर्धांगवायू झाला आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुध्दा मनु तालिबानी प्रवृत्तीमुळे महिलांना दुय्यम दर्जा मिळत आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सर्व स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

यामुळे देशातील स्त्रियांना सन्मान मिळणार आहे. तर त्या आर्थिक दृष्ट्या सबळ होऊन देश महाशक्ती होऊ शकणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here