महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्यावतीने अभिवादन
नगर – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्यावतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकराव बाबर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, दत्ता जाधव, संजय झिंजे, विलास उबाळे, नलिनी गायकवाड, परेश लोखंडे, श्रीकांत चेमटे, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, पप्पू भाले, संतोष गेनप्पा, सोपान कारखिले, विठ्ठल जाधव आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध महात्मा फुले यांनी साहित्यातून व्यथा मांडल्या. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची सुरुवात करुन युवकांना एकत्र करुन सामाजिक कार्यात सक्रिय केले. हीच प्रेरणा घेऊन समाजात काम करत समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी काम केले पाहिजे असे सांगितले.
यावेळी किरण काळे म्हणाले, महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. शिक्षण व समता या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.
यावेळी भगवान फुलसौंदर म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते.महात्मा ज्योतिबा फुले हे उच्चकोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. हेच कार्य आपणा सर्वांना पुढे घेऊन जायचे असल्याचे सांगितले.