महात्मा फुले जयंतीनिमित्त माळीवाडा येथील पुतळ्यासमोर मंडप व बसण्याची व्यवस्था करावी -प्रा. विधाते
क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतीराव फुले कृती समितीची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शहराच्या माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी गुरुवारी (दि.11 एप्रिल) साजरी केली जाणार आहे. महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या समाजबांधवांच्या सोयीसाठी परिसरात स्वच्छता करुन मंडप व बैठक व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करुन देण्याची मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतीराव फुले कृती समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेवून सदर मागणीचे निवेदन दिले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व समाज घटकातील अनुयायी उपस्थित राहतात. तसेच या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते. मनपा प्रशासनाच्या वतीने देखील महात्मा फुले यांना दरवर्षीप्रमाणे अभिवादन करण्यात यावे व अभिवादनसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मनपाच्या माध्यमातून मंडप व बैठक व्यवस्था करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. आयुक्त जावळे यांनी मनपाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन केले जाणार असल्याचे स्पष्ट करुन, तातडीने परिसराची स्वच्छता करुन मंडप व बैठक व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.