महात्मा फुले व सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करुन पाठ्यपुस्तकांचे वाटप
विद्यार्थ्यांच्या स्वागताने शाळेविषयी भिती कमी होईल – बाळासाहेब बोराटे
नगर – विद्यार्थ्यांच्या जीवनाला खर्या अर्थाने आकार शाळेतून मिळत असतो. प्रत्येक पालकाला आपला मुलगा हा उच्च शिक्षित व्हावा, हीच अपेक्षा असते. त्याचा पाया शाळेतूनच तयार होतो. आज शाळेचा पहिलाच दिवस शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक असतो. या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केल्याने त्यांच्यातील शाळे विषयीची भिती नाहिशी होते. तसेच पहिल्यास दिवशी पाठ्य पुस्तके मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर आनंद होता. श्री सावताश्रम संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोप्रयत्न केले जात आहेत. शिक्षकांच्या सहकार्याने शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. यंदाच्या वर्षीही विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न करु, असे चेअरमन बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले.
श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप चेअरमन बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सचिव प्रा.सुनिल जाधव, शेखर व्यवहारे, मुख्याध्यापक राजकुमार शिंदे, राजीव घोलप व शिक्षकवृंद उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.सुनिल जाधव यांनी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून त्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम संस्था नेहमीच राबवत असते. शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके देऊन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परिक्षा, क्रिडा स्पर्धासाठी प्रोत्साहित केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी शेखर व्यवहारे यांनी सांगितले की, विद्यालयाच्यावतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. मोफत पाठ्य पुस्तकांच्या वाटपाबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात येत असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन राजीव घोलप यांनी केले तर आभार राजकुमार शिंदे यांनी मानले. यावेळी शिक्षकवृंद, पालक, विदद्यार्थी उपस्थित होते.